दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअरची दिशा निश्चित करता यावी यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची ऑनलाइन कलमापन चाचणी (अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) घेण्यात येणार आहे. मात्र ऐन दहावीच्या परीक्षेच्या तोंडावरच ही चाचणी होणार असल्याने मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांची ही कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न विचारले जाणार असून ती सुमारे तासभर चालेल. या नोंदींचा अभ्यास करून विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठल्या विषयाकडे किंवा शाखेकडे आहे याचा अंदाज वर्तवला जाणार आहे.
या चाचणीचा निकाल दहावीच्या निकालपत्रासोबत विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या वर्षी वेळ कमी असल्याने केवळ कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. परंतु पुढील वर्षी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांची अभिरूची व्यक्तिमत्त्व या संबंधात सर्वसमावेशक असा अहवाल देऊ, असे मुंबई विभाग मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
या चाचणीसंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे विभागवार शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि माहिती-तंत्रज्ञान समन्वयकांची बैठक घेण्यात येत आहेत.
या संदर्भात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ही चाचणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. मात्र या काळात दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असणार आहे. त्यानंतर लगेचच लेखी परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे हा काळ कलमापन चाचणीकरिता योग्य नाही, असे काही मुख्याध्यापकांनी लक्षात आणून दिले.
ज्या मुलांना फेब्रुवारीमध्ये चाचणी देता येणार नाही त्यांच्याकरिता एप्रिलमध्ये पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांमध्ये संगणकाची सुविधा नाही त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शेजारच्या शाळेत कलचाचणी घेण्यात येईल. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ही कलचाचणी देईल. पुढील वर्षीही ही चाचणी ऑनलाइन करण्यात येणार असली तरी या चाचणीबाबत मुख्याध्यापकांमध्ये नाराजी आहे.

मुख्याध्यापकांचा विरोध..
समुपदेशक संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून या नोंदींचा अभ्यास करून अहवाल देतील. मात्र फेब्रुवारीत ही चाचणी घेण्याला मुख्याध्यापकांनी विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी दहावीच्या परीक्षेच्या तयारीत आहेत. त्याच वेळेस ही चाचणी घेणे चुकीचे असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. तर काहींनी ही चाचणी नववीपासून सुरू करण्याची सूचना केली आहे. याशिवाय चाचणीमध्येही काही त्रुटी असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.