गरवारे संस्थेमध्ये तीन वर्षीय ‘बीएस्सी इन एव्हिएशन’ अभ्यासक्रमाला सुरुवात

विमान उड्डाणाचे धडे देण्याचा मुंबई विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार असून, यासंदर्भात शुक्रवारी गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन आणि बॉम्बे फ्लाइंग क्लब यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार या अभ्यासक्रमाचे पुस्तकी शिक्षण गरवारे संस्थेत होईल, तर विमान उड्डाणाचे प्रशिक्षण फ्लाइंग क्लबतर्फे धुळे येथे दिले जाणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) पात्रता असून या अभ्यासक्रमासाठी ३० प्रवेश क्षमता आहे. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असणार आहे. झपाटय़ाने विकसित होणाऱ्या वैमानिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीसाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम असणार आहे.

भारत सरकारच्या कौशल्य विकास अभियानाच्या पाश्र्वभूमीवर नवीन रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यापीठात राबविले जाणार आहेत.

बीएस्सी (एव्हिएशन) अभ्यासक्रमामुळे व्यावसायिक पायलट परवान्याच्या समकक्ष पदवी मिळते. त्यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील इतर प्रशासकीय नोकऱ्या मिळविण्यास हे विद्यार्थी पात्र होतात. दरवर्षी बरेच विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी परदेशी जातात, त्या सर्वाना आपण भारतातच त्याच दर्जाचे प्रशिक्षण देणार आहोत.

– डॉ. अनिल कर्णिक , संचालक, गरवारे करिअर एज्युकेशन संस्था, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाने समाजाचे बौद्धिक आणि नतिक शक्तिस्थान म्हणून गेल्या १५८ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. सामाजिक मूल्य आणि संधींची सतत वाढणारी जबाबदारी उत्साहाने वागवत देशाला विशेषत: महाराष्ट्र आणि मुंबई शहराला उत्तम गुणवत्ता दिली आहे. याच जोडीला मुंबई विद्यापीठाने हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकत हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

– लीलाधर बनसोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)