विज्ञानासंबंधित मूलभूत संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’
या संस्थेतील अभ्यासक्रम तसेच संख्याशास्त्रसंबंधित संशोधनासाठी नाव कमावलेल्या इंडियन
स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेतील अभ्यासक्रमांची ओळख –
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स
बंगलोरस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये २०११ सालापासून बॅचलर ऑफ सायन्स हा संशोधनाला प्राधान्य देणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विज्ञानाचे मूलभूत विषय आणि आंतरशाखीय विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. संशोधन, औद्योगिक जगत आणि उच्च शिक्षणात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. आंतरशाखीय विषयांमध्ये अभियांत्रिकी, मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांच्या समावेशासोबतच एक वर्ष कालावधी असलेल्या संशोधन प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
चार वषार्ंचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमात एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशनची संधी दिली जाते. यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र आणि मटेरिअल्स यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर याच संस्थेत पीएचडीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो. याचा अर्थ विद्यार्थ्यांचा एक वर्षांचा कालावधी वाचतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीची संधी मिळण्यासोबतच विविध संशोधन संस्थांमध्ये तसेच देशी परदेशी कंपन्यांमध्येही करिअरच्या उत्तम संधी मिळू शकतात. यासाठी संस्थेमध्ये प्लेसमेंट केंद्र उघडण्यात आले आहे. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. काही आयआयटीमध्ये अशा विद्यार्थ्यांना केवळ मुलाखतीद्वारेच प्रवेश दिला जातो. अशांना ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग ही परीक्षा द्यावी लागत नाही. परदेशातील शिक्षण संस्थांमध्येही पीएची करण्यासाठी बीएस पदवी पात्र मानली जाते.
या अभ्यासक्रमाला ११० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये ३२ खुल्या गटातील आणि राखीव गटातील जागांचा समावेश आहे. प्रत्येक राखीव गटासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाते. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश सूचना दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली जाते. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरावा लागतो. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीवायपी)मध्ये संपादन केलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. साधारणत: मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रवेशाचा दुसरा टप्पा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात घेतला जातो. दरवर्षी १ ऑगस्टपासून नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होतो.
अर्हता : या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने विज्ञानशाखेमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॉटिक्स या विषयांचा अभ्यास केलेला असावा. त्याशिवाय बायोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स या विषयांचा अभ्यास केलेल्या उमेदवारांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. उमेदवारांना बारावीमध्ये ६० टक्के किंवा प्रथम श्रेणी मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. http://www.iisc.ernet.in/ug या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. ई-मेल – deanugoff@admin.iisc.ernet.in संपर्क- असिस्टंट रजिस्ट्रार, अकॅडमिक,अ‍ॅडमिशन युनिट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर- ५६००१२, दूरध्वनी- ०८०२२९३३४०० या संस्थेत होस्टेलची तसेच मेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवेशप्रक्रिया : बॅचलर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमाला पुढीलपकी कोणत्याही एका परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो.

  • JEE- MAIN मध्ये सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी साधारणत १८० ते २०० गुण मिळवायला हवेत. इतर मागास वर्ग (नॉन क्रिमीलेअर) गटातील उमेदवारांनी साधारणत: १६२ ते १८० गुण आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग गटातील उमेदवारांनी ९० ते १०० गुण मिळवायला हवेत.
  • ऑल इंडिया मेडिकल एन्ट्रान्स एक्झामिनेशन (NEET- नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षेतील मेरिट यादीमध्ये उमेदवारांनी येणे आवश्यक आहे.
  • किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारच्या नियमानुसार इतर मागासवर्ग (नॉन क्रिमीलेअर गट), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग गटासाठी जागा राखीव ठेवण्यात येतात.

प्रत्येक कॅम्पसमध्ये १२० विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण ६०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत होणाऱ्या परीक्षेवर आधारित गुणांवर दिला जातो. १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश हा आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइण्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशनमधील गुणांवर आधारित दिला जातो. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार जागा राखीव ठेवल्या जातात. वरील तिन्ही प्रकारच्या प्रवेशप्रकियेसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरावा लागतो. प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक आहे.
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट

विविध विषयातील सर्वेक्षण आणि विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालं आहे. व्यावसायिक कंपन्या, विविध नियतकालिके,
वृतवाहिन्या, सामाजिक संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, जाहिरात संस्था अशा सर्वेक्षणासाठी मोठा खर्च करत असतात. कामाची योजना निश्चित करण्यासाठी अशा सर्वेक्षणांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जातो. या विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकराच्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेनं संख्याशास्त्र आणि त्याच्याशी निगडित अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
शिष्यवृत्तीसह पदवी : संख्याशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये गती आणि आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. आजच्या काळात शिक्षणासाठी खूप खर्च येत असताना ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देते.

  • बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स) : अर्हता- बारावी (गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), कालावधी- तीन वर्ष, शिष्यवृत्ती- दरमहा तीन हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकाता येथे करता येतो.
  • बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स) : अर्हता- बारावी (गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), कालावधी- तीन वर्ष, शिष्यवृत्ती- दरमहा तीन हजार रु. हा अभ्यासक्रम बंगलोर येथे करता येतो.
  • प्रवेश परीक्षा : या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा व मुलाखत घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी साधारणत: मे महिन्यात घेण्यात येते.

संपर्क : डीन ऑफ स्टडीज, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, २०३, बॉरकपोर ट्रंक रोड, कोलकता ७००१०८. परीक्षेचा अर्ज www.isical.ac.in/-deanweb या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जातो. ई-मेल isiadmission@iscal.ac.in