बीडमधील आदित्य दंत महाविद्यालयातील गैरप्रकारांच्या निषेधार्थ उद्या (१५जानेवारी) आझाद मैदानात ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक धरणे आंदोलन करणार आहेत.
महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक सुविधांची वानवा या विरोधात तक्रार केली म्हणून व्यवस्थापनाकडून आपली छळवणूक होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रकाराची तक्रार राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाकडे केली आहे. या त्रासामुळे मुलांना येथे शिकण्याची इच्छा नसून त्यांनी अन्य महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयात ८० टक्के मुली शिकतात. पण, व्यवस्थापनाकडून होणाऱ्या छळवणुकीमुळे ११ जानेवारीपासून या मुलींनी महाविद्यालयात जाण्यास नकार दिला आहे.
या महाविद्यालयात साधे पंखे, वीज, वर्गही नाहीत. प्रत्येक वर्षांला चार ते सहा मृतदेह विच्छेदनासाठी वापरणे आवश्यक असताना सहा वर्षे एकच मृतदेह वापरला जात आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी शैक्षणिक सुविधांच्या अभावाबरोबरच गेली तीन महिने दोन मुख्य विषयांना एकही शिक्षक शिकविण्यासाठी येत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, अधिष्ठाता ही कुठलीच प्रमुख पदे भरलेली नाहीत. यामुळे दरवर्षी या महाविद्यालयाचा निकाल फारच कमी लागतो. आझाद मैदानात सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी आणि पालक जमून धरणे आंदोलन करणार आहेत.