वटवाघुळांच्या त्रासामुळे विद्यापीठातील १५ झाडे थेट बुंध्यापर्यंत छाटल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. विद्यापीठाचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वटवाघुळांचा त्रास होत असल्याने वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी विद्यीपीठाकडून एच पूर्व विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती. झाडांच्या फांद्या विरळ केल्यानंतर वटवाघळे वस्तीला राहणार नसल्याचे लक्षात घेऊन पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने दोन महिन्यांपूर्वी तशी परवानगी दिली. अशोक, गुलमोहर आदी पाच प्रकारच्या वीस झाडांच्या पाच इंच व्यासापर्यंतच्या फांद्या कापण्याची परवानगी घेऊन गेलेल्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून त्यानुसार छाटणी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात झाडाच्या मुख्य खोडापर्यंत सर्व फांद्या छाटून त्यांना बोडके केले आहे. याची गंभीर दखल वॉर्ड अधिकाऱ्यांनीही घेतली आहे. वृक्ष तोडणे हा दखलपात्र गुन्हा आहे. मात्र विद्यापीठ ही सरकारी संस्था असल्याने थेट गुन्हा नोंदवण्याऐवजी त्यांना नोटीस पाठवण्यात येत आहेत. परवानगीशिवाय अधिक छाटणी केल्याप्रकरणी विद्यापीठाकडून उत्तर आल्यावर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे एच पूर्व वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.