विद्यापीठाने लागू केलेल्या श्रेयांक आणि गुणांक पद्धतीमध्ये ७५/२५ या सूत्रानुसार गुणवाटप केले जाते. हे वाटप बीएमएम या अभ्यासक्रमासाठी चुकीचे असल्याचे सांगत पाच विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली आहे. यासंदर्भात समितीने विचार करण्यास सुरुवात केली असली तरी निर्णय होईपर्यंत हीच पद्धती लागू राहणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यांत झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत श्रेयांक आणि गुणांक पद्धतीतील ६०/४० या सूत्रा ऐवजी ७५/२५ हे सूत्र मान्य करण्यात आले. या सूत्रानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचे ७५ गुणांपैकी तर प्रात्यक्षिकचे गुण २० पैकी तर ५ गुण हे वर्गातील वागणुकीसाठी दिले जाणार आहेत. मात्र बीएमएमच्या विद्यार्थ्यांना हे सूत्र चुकीचे असून त्यांना प्रात्यक्षिकासाठी अधिक गुण मिळावे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात विद्यापीठ र्सवकष विचार करून योग्य तो निर्णय घेईल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.