03 August 2020

News Flash

बोर्डाच्या २० पर्सेटाइलला ७५ टक्क्य़ांचा पर्याय

आयआयटीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने थोडासा दिलासा दिला आहे.

| November 8, 2014 04:39 am

आयआयटीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने थोडासा दिलासा दिला आहे. यानंतर आयआयटीच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत ‘टॉप २० पर्सेटाइल’ किंवा ७५ टक्के गुण यातील जे कमी असतील ते गृहीत धरण्यात यावेत असा निकष लावण्यात आला आहे. सीबीएससी, आयसीएससीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आयआयटी काऊन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आयआयटीतील प्रवेशासाठीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला. आयआयटीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स द्यावी लागते. यापूर्वीच्या निकषांनुसार जेईई मेन्स मधून अ‍ॅडव्हान्ससाठी विद्यार्थी पात्र ठरले आहेत आणि ज्यांना बारावीला २० पर्सेटाईल आहेत असे विद्यार्थी अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरत होते. मात्र, अनेक राज्यांच्या आणि सीबीएससी, आयसीएससी यांसारख्या केंद्रीय परीक्षा मंडळांमध्ये २० पर्सेटाइलचा कट ऑफ हा अगदी ९० टक्क्य़ांपर्यंतही होता. त्यामुळे हा निकष बदलण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता २० पर्सेटाईल किंवा बोर्डाच्या परीक्षेत ७५ टक्के गुण यांपैकी जे गुण कमी असतील ते गृहीत धरण्यात येणार आहेत. यावर्षीपासून हे नवे निकष अमलात येणार आहेत.
प्रवेशाचे निकष शिथिल करण्यात आले असले, तरीही राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना त्याचा विशेष फायदा होणार नाही. गेली दोन वर्षे राज्यमंडळाचा २० पर्सेटाईलचा कट ऑफ हा ७५ टक्क्य़ांच्या खालीच आहे. त्यामुळे बदललेल्या निकषांचा सर्वाधिक फायदा हा सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना होणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. याबाबत आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले, ‘राज्यमंडळाचा कट ऑफ साधारण ६५ टक्क्य़ांच्या जवळपास असतो. त्यामुळे राज्यमंडळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा ताण नक्कीच हलका झाला आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2014 4:39 am

Web Title: board examination 20 percent percentile
Next Stories
1 संशोधनचौर्याला प्रतिबंध
2 रुईया आता ‘स्टार महाविद्यालय’
3 सहा लाख अपंग मुले शाळाबाह्य
Just Now!
X