शुल्क आकारताना भेदभाव केल्यामुळे शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या २४ पाल्यांना बोरिवलीच्या जेबीसीएन शाळेने बिनदिक्कत काढून टाकले. शाळेच्या या मनमानी कारवाईच्या विरोधात पालकांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे.
जेबीसीएन शाळेमध्ये प्रवेशाच्या वेळी पालकांकडून शाळेत पायाभूत सुविधा व उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ५० ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान शुल्क आकारले जाईल व यात प्रत्येक वर्षी पाच ते १० टक्के वाढ केली जाईल, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले होते. परंतु, शाळा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने मनमानी कारभारास सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांचे ‘पायोनियर’ आणि ‘नॉन पायोनियर’ असे गट केले. यानंतर पायोनियर गटातील विद्यार्थ्यांकडून वर्षांला ६८ हजार रुपये, तर नॉन पायोनियर गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून १ लाख १७ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. यामुळे एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात दरी निर्माण केल्याचे पालकांचे म्हणणे होते. नॉन पायोनियर गटातील काही पालकांनी शाळेच्या या मनमानी कारभाराला विरोध करत केवळ ६८ हजार रुपये शुल्क भरण्याची भूमिका घेतल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात गेले अनेक महिने वाद सुरू होता.
या संदर्भात पालकांनी शालेय शिक्षण विभाग, पोलीस, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे शाळेविरोधात तक्रारही दाखल केली होती. आता ज्या पालकांनी अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार दिला होता त्यांच्या २४ पाल्यांना शाळेने काढून टाकत ‘शाळा सोडल्याचा दाखला’च घरी पाठवून दिला आहे. वाढीव शुल्क भरण्यासाठी वारंवार सूचना देऊनही शुल्क न भरल्याने तुमच्या पाल्याला काढले जात आहे, असा खुलासा शाळेतर्फे करण्यात आला आहे.