उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामाला वेग यावा तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चात कपात साधता यावी यासाठी लंडनच्या ‘सिटी अ‍ॅण्ड गिल्ड्स’ या व्यावसायिक अभ्यासक्रमातील मातब्बर शैक्षणिक संस्थेने आपल्या हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका बंगळुरू येथील शैक्षणिक संस्थेत तपासण्यासाठी पाठविल्या आहेत. उत्तर पत्रिका तपासण्यासाठी ‘आऊट सोर्सिग’चा पर्याय निवडण्याचा जगातला हा पहिलाच प्रकार आहे!
उत्तर पत्रिका तपासण्याची आमची पद्धत अगदी सुलभ पण काटेकोर आहे. त्या कामासाठी परीक्षकांची निवडही अतिशय तावूनसुलाखून केली जाते. मग ते परीक्षक कोणत्याही देशातले असले तरी जगभर आमच्या संस्थेच्या उत्तर पत्रिका तपासण्यात तसूभरही फरक पडत नाही, असे संस्थेने म्हटले आहे.
भारतात ज्या उत्तर पत्रिका पाठविल्या जातात त्या कार्यशैली विकासविषयक अभ्यासक्रमांच्या आहेत. हे अभ्यासक्रम कोणालाही कोणत्याही महिन्यापासून निवडता येतात. त्यामुळे वर्षभर त्यांच्या परीक्षाही सुरू असतात. २० दिवसांत उत्तर पत्रिका तपासण्याची गरज असते. ती वेळेत साधता यावी, यासाठी १८ महिन्यांपूर्वी आऊट सोर्सिगची कल्पना पुढे आली. त्यातून ‘मेरिट ट्रॅक’ या उत्तर पत्रिका तपासणाऱ्या व परीक्षाप्रक्रियेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या भारतातील सर्वात मोठय़ा संस्थेकडे हे काम गेले आहे.
या आऊट सोर्सिगला काही शिक्षण तज्ज्ञांचा मात्र आक्षेप आहे. बकिंगहॅम विद्यापीठातील शिक्षण आणि रोजगार केंद्राचे संचालक प्रा. अ‍ॅलन स्मिथर्स म्हणाले की, भारतीयांच्या क्षमतेबद्दल माझ्या मनात शंका नाही पण या देशात ज्या पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जातो त्याचा त्यांना किती अनुभव असतो, हा प्रश्न आहे.