व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट’ (सीमॅट) या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ९ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.२१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. गेल्या वर्षीपासून ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’तर्फे (एआयसीटीई) ही परीक्षा घेण्यात येत आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या असंख्य प्रवेश परीक्षांचा ताण कमी व्हावा यासाठी सीमॅट ही एकच परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्याचा निर्णय झाला होता. देशभरातील तीन हजाराहून अधिक व्यवस्थापन संस्थांमधील प्रवेशांसाठी ही परीक्षा ग्राह्य़ धरली जाणार आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. वर्षांतून दोनवेळा ही परीक्षा घेतली जाईल.
परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आला नसून आधीप्रमाणेच ही परीक्षा तीन तासांची असेल. यात प्रत्येकी १०० गुणांचे चार विभाग असतील. परिणामात्मक पृथकरण, माहितीचे स्पष्टीकरण, भाषा, तर्कबुद्धी, सर्वसामान्य ज्ञान आदींचा कस यात पाहिला जाईल. आधीच्या दोन परीक्षांना अनुक्रमे ७० हजार आणि ६० हजार विद्यार्थी बसले होते.