राज्यातील ३६४ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सुमारे ६४ हजार जागा रिक्त असल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरअखेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तसेच राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने २०१४-१५ वर्षांसाठी ज्या १५ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रद्द ठरविली आहे अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन स्वत:च्या भवितव्याचे नुकसान करू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मनविसेने संबंधित महाविद्यालयांच्या परिसरातच मोठे फलक लावून विद्यार्थी व पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये एआयसीटीईच्या निकषांचे पालन होत नसल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर एआयसीटीईने सखोल चौकशी करून १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांना २०१४-१५ सालासाठी प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरवले.
त्यानंतर संबधित महाविद्यालयांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने एआयसीटीईच्या निर्णयाला स्थगिती दिली तसेच या महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्याचे अंतरिम आदेश दिले. त्याचबरोबर भविष्यात निर्णय या महाविद्यालयांच्या विरोधात गेल्यास या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तंत्रशिक्षण संचालनालयानेही निर्णय विरोधात गेल्यास एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांना अन्यत्र सामावून घेण्यास स्पष्ट असमर्थता व्यक्त केली.
या निर्णयाची अनेक विद्यार्थ्यांना माहिती असले शक्य नसल्यामुळे मनविसेने संबंधित महाविद्यालयांच्या परिसरात न्यायलयाच्या निर्णयाचे तसेच पालकांना सावध करणारे मोठमोठे फलक लावले आहे.
मनविसेचे संतोष गांगुर्डे तसेच अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्यापुढाकाराने हे विद्यार्थी-पालक जनजागृती आंदोलन सुरु करण्यात आले आहे.