मुंबई विद्यापीठाच्या मरिन लाइन्स क्रीडा संकुलाच्या परिसरात ‘हिंदी विद्या भवन’ या संस्थेने अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण ताबडतोब हटविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी राज्यपालांनाच पत्र लिहिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मरिन लाइन्स येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात ‘हिंदी विद्या भवन’ने अतिक्रमण केले आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मैदानाच्या दोन वहिवाटा आहेत. यातील एक वाट या भवनाच्या अतिक्रमणामुळे बंद झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संकुलातून वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठीही रस्ता देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर संकुलात आयपीएलचे बॅनर्सही लावण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी तातडीने बंद कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे व अधिसभा सदस्य तांबोळी आणि मनविसेचे मुंबई विद्यापीठ सरचिटणीस संतोष गांगुर्डे यांनी केली आहे. विद्यापीठाच्या संकुलातील अतिक्रमण ही निंदनीय बाब असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची भेट घेतली असून हे अतिक्रमण लवकरच हटविने जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.