पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील १६ खासगी अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) संस्थांमधील २६ अभ्यासक्रमांना ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा’ने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी संलग्नता नाकारली आहे. परिणामी तंत्रशिक्षण संचालनालयाने या अभ्यासक्रमांना ‘केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिये’तून (कॅप) वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संलग्नता देण्यास मंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे, या अभ्यासक्रमांचे प्रथम व द्वितीय वर्षांसाठीचे प्रवेश यंदा होऊ शकणार नाहीत.
यात रायगडमधील ‘डॉ. नंदकुमार तासगावकर पॉलिटेक्निक’ या संस्थेचाही समावेश आहे. या संस्थेतील चार अभ्यासक्रमांना मंडळाने (एमएसबीटीई) संलग्नता नाकारली आहे. तर साताऱ्यातील ‘रामराव निकम पॉलिटेक्निक’ या संस्थेतील संगणक अभियांत्रिकी या विषयाला संलग्नता देण्यास मंडळाने नकार दिला आहे. या शिवाय नागपूरमधील ३, चंद्रपूर, जळगावमधील प्रत्येकी २, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, अकोला, भंडारा, धुळे, अहमदनगर येथील प्रत्येकी १ अशा एकूण १६ संस्थांमधील २६ अभ्यासक्रमांना संलग्नता नाकारण्यात आली आहे. त्यामुळे, ‘तंत्रशिक्षण संचालनालया’ने या अभ्यासक्रमांना प्रथम व द्वितीय वर्ष (आयटीआय केलेल्यांना थेट प्रवेश) कँपमधून वगळले आहे.
या संस्थांचे ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा’शी संलग्नित होत्या. मात्र, पात्रता निकष न पाळल्यामुळे तपासणीअंती त्यांच्या काही अभ्यासक्रमांची संलग्नता मंडळाने रद्द केली. त्यामुळे या संस्थांना संस्थास्तरावरही प्रवेश करता येणार नाही आहेत. तरिही या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्या संलग्नतेचा प्रश्न उद्भवू शकतो. परिणामी या संस्थांमधील या २६ अभ्यासक्रमांचे प्रवेश करू नये, असे मंडळाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी संचालनालयाला कळविले होते. या संस्थांची व संलग्नता नाकारण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी आणि पालकांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ६६६.३िी.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळावर मिळेल.

विद्यार्थ्यांचे स्थलांतर लवकरच
‘पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान’च्या चुनाभट्टीमधील ‘मनोहर फाळके तंत्रनिकेतन’ची मान्यता ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) टप्प्याटप्प्याने काढून घेतल्याने या संस्थेत दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत इतर संस्थेमध्ये स्थलांतर करावे लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया कधी सुरू होणार या विषयी विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे वर्ग सुरू झाल्याने स्थलांतर होणार कधी आणि अभ्यास करणार कधी असा प्रश्न पालकांसमोर आहे. या संबंधात संचालक सु. का. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सर्व मिळून साधारणपणे ७०० विद्यार्थ्यांचे इतर संस्थांमध्ये स्थलांतर करावे लागणार आहे.