ऑनलाइनच्या माध्यमातून इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना तो दोन भागांत भरावा लागतो. पहिला भाग पूर्ण करून त्याचे ‘स्टेटस कन्फर्म’ असल्याशिवाय दुसरा भाग उघडत नाही. त्यामुळे आधी पहिला भाग पूर्ण करून त्याचे ‘स्टेटस कन्फर्म’ असल्याची खात्री करून घ्या. प्रस्तुत लेखात आपण फक्त दुसऱ्या भागाचाच विचार करणार आहोत.
माहिती पुस्तिकेमध्ये पृष्ठ क्र. ३० वर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दाखविलेला आहे. तो नीट वाचा. त्यातील आवश्यक त्या तांत्रिक बाबी माहिती पुस्तिकेच्या आधारे नीट समजावून घ्या.
माहिती पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणे दुसऱ्या भागाचे सहा उपविभाग आहेत. माहिती पुस्तिकेच्या पृष्ठ क्र. ३०ची एक छायाप्रत काढून घ्या आणि माहिती पुस्तिकेच्या आधाराने आणि आवश्यक वाटेल तेथे तुमच्या शिक्षकांच्या सल्ल्याने त्या छायाप्रतीतील रकाने स्वहस्ते भरा. जेणेकरून प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना कमीत कमी अडचणी येतील.
आपल्याला कोणत्या शाखेत प्रवेश हवा आहे त्याची आधी निश्चित खात्री करून घ्या. शक्यतो एकाच शाखेची निवड करा. अगदीच संभ्रम असेल तर आणि तरच दोन शाखांची निवड करा. तुमच्या समोरील अडचणी कमीत कमी करण्यासाठी योग्य शाखेची निवड आवश्यक आहे. कृपा करून ९० टक्के मिळाले तर कला शाखा, असला अतार्किक विचार करू नका. ज्या शाखेकडे तुमचा नैसर्गिक कल आहे त्या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमची प्रगती विनासायास होईल याची जाणीव असू द्या. अर्थात अगदीच कमी गुण मिळाल्यास तुम्हाला निवडीला वाव कमी असेल. येथे पालकांनाही दोन्ही हात जोडून विनंती करावीशी वाटते. तुमच्या सुप्त  आणि अतृप्त इच्छा तुमच्या मुलामुलींवर लादू नका. त्यांना त्यांच्या नैसर्गिक रीतीने फुलू द्या. त्यांना मार्गदर्शन करा, पण त्यांच्यावर सक्ती करू नका.
एकदा शाखेची निवड ठरली की, त्यानंतर कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा याविषयी तुम्हाला निर्णय करायचा आहे. हा निर्णय वाटतो तितका सोपा नाही. कॉलेजची निवड करताना दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जर विज्ञान अथवा वाणिज्य शाखेत द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश हवा असेल तर हवा असलेला द्विलक्षी अभ्यासक्रम कोणत्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे, त्याला अनुदान आहे अथवा कसे त्यासाठी किती शुल्क आहे, याची माहिती पृष्ठ क्र. ५४ ते ८४ (विज्ञान द्विलक्षी) आणि पृष्ठ क्र. ८६ ते ९२ (वाणिज्य द्विलक्षी) महाविद्यालयनिहाय दिली आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयामध्ये मागील वर्षी प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय काय कटऑफ होता याची माहिती पृष्ठ क्र. १३९ ते २४४ (वाणिज्य) आणि पृष्ठ क्र. २४६ ते ३१६ (विज्ञान) मधून करून घ्या.
तुम्हाला प्रवेश हवा असलेल्या कॉलेजमध्ये प्रवर्गासाठी मागील वर्षीचा प्रवेशासाठीचा कटऑफ जर तुम्हाला मिळालेल्या गुणांपेक्षा ५ टक्क्यांहून अधिक असेल तर तुम्ही अशा महाविद्यालयाची निवड न केलेली बरी. याविषयी प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना तुम्हाला संगणकाकडून सूचना मिळेलच.
अशा तऱ्हेने माहिती पुस्तिकेच्या आधारे किमान ३५ व कमाल ६० महाविद्यालयांची यादी तयार ठेवा. म्हणजे कमीत कमी वेळात तुमचा अर्ज बिनचूक भरला जाईल. याविषयी अधिक  तपशीलवार चर्चा उद्याच्या लेखात.
(लेखक २०१५च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कोअर व कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.)