‘लोकसत्ता मार्ग यशाचा’तून तज्ज्ञांचे धडे

परीक्षेच्या तणावाचा सामना कसा करावा? दहावी-बारावीनंतर करिअरचे मार्ग कोणते? अशा असंख्य प्रश्नांविषयी लोकसत्ता ‘मार्ग यशाचा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून हा कार्यक्रम २ आणि ३ डिसेंबर रोजी टिपटॉप प्लाझा ठाणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यालंकार प्रस्तुत या कार्यक्रमासाठी एसआरएम युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षांच्या तणावाचा सामना कसा कराल? करिअर निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात करिअरमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व या विषयावर सॉफ्ट स्किल्सविषयक प्रशिक्षक गौरी खेर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
दहावी किंवा बारावीनंतर काय याचे खात्रीशीर आणि समाधानकारक उत्तर करिअरच्या सुरुवातीलाच मिळावे आणि या दृष्टीने अभ्यासक्रमांची निवड करता यावी. तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान आदी अभ्यासशाखांचे पर्याय यासंबंधी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे.
कार्यक्रमातील प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध –
’लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा, ठाणे (पश्चिम).
’हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रस्ता, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम).
’विद्यालंकार क्लासेस, इशान आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रस्ता, ठाणे (पश्चिम).