शाळेतील तरणतलावामध्ये पाय घसरून पडलेल्या मुलीच्या गंभीर दुखापतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल बोरिवलीतील एका शाळेविरोधात पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बोरिवलीतील जे. बी. सी. एन. इंटरनॅशनल शाळेत गीता आणि जेराल्ड आरहाना या दाम्पत्याच्या तीन मुली शिकतात. यापैकी सहा वर्षांची जायरा ही मुलगी १९ सप्टेंबरला शाळेतील तरणतलावामध्ये पाय घसरून पडली. पोहण्याचा तास असल्यामुळे ती तरणतलावाजवळ गेली होती. तेथील पुरुष मार्गदर्शकाने तिला धावण्यास सांगितल्याने गुळगुळीत जमिनीवर ती पाय घसरून एक पाय कट्टय़ावर तर एक पाय तलावात अशा पद्धतीने पडली. तेथील मार्गदर्शकाने तिला बाजूला बसण्यास सांगितले. मात्र, दुखणे वाढल्याने जायराने आपल्या दुखापतीविषयी आपल्या शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर घरी आल्यानंतर तिने हा प्रकार आपल्याला सांगितला. मात्र दरम्यानच्या काळात दुखापतीविषयी कळूनही शाळेच्या व्यवस्थापनाने तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत अथवा आमच्याशीही संपर्क साधला नाही, असा दावा जायराच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. तसेच आम्ही शाळेकडे पत्राद्वारे विचारणा केली असता त्यालाही उत्तर दिले नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
मुलीवर दुसऱ्या दिवशी रुग्णालयात जाऊन उपचार केले. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा दुखू लागल्याने तिला जसलोक रुग्णालयात दाखल करावे लागले. विविध चाचण्या केल्यानंतर तिला गुप्तांगाजवळ दुखापत झाल्याचे लक्षात आले आहे. अजूनही तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आमच्या मुलीवर वेळीच उपचार न झाल्याने तिचे दुखणे बळावले आहे. शाळेने दुखापतीकडे दुर्लक्ष केल्यानेच ही वेळ आली. पोलिसांनी या शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी.
 – पालक