नेट-सेट, पीएचडी तसेच परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मुंबई विद्यापीठातर्फे देऊ केलेली श्रेणी सुधार योजना एलएलएम अभ्यासक्रमाला लागू नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत़े
अपेक्षित गुण न मिळाल्यास विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची पुनर्परीक्षा देऊन श्रेणी सुधारता येते. ही योजना सर्व अभ्यासक्रमांना लागू आहे. परंतु एलएलएम या विषयाला अपवाद करण्यात आला आह़े  नेट-सेट, पीएचडी तसेच परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होतो. राज्यातील इतर सर्व विद्यापीठात एलएलएमला ही योजना लागू आहे. मग मुंबई विद्यापीठच त्याला अपवाद का, असा एलएलएमच्या विद्यार्थ्यांचा सवाल आहे.
दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तसेच एलएलएमचे विभागप्रमुख यांच्याकडे ही योजना लागू करण्यासंदर्भात विचारणा करीत असतात. त्यांना नेहमी हात हलवित परतावे लागते. गेल्या वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान झाल़े आता एलएलबीचे प्रवेश महिनाभरावर आले आहेत. परिणामी लवकरच या अभ्यासक्रमाला श्रेणी सुधार योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी प्रहार या विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. अजय तापकीर यांनी केली़