केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(सीबीएसई) मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकाल सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांमध्ये जाहीर झाले असून या निकालामध्ये राज्याचा निकाल ९९.८९ टक्के इतका लागला आहे. सीबीएसईचा संपूर्ण देशाचा निकाल ९८.८७ टक्के लागला़  गतवर्षी महाराष्ट्राचा निकाल ९९.८० टक्के होता.
यंदा सीबीएसईच्या परीक्षेला देशात १३ लाख २६ हजार १०० विद्यार्थी बसले होते. यातील चेन्नई आणि त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सोमवारी जाहीर झाला तर उर्वरीत विभागांचा निकाला मंगळवारी जाहीर करण्यात आला़ महाराष्ट्र हे चेन्नई विभागात येत असून या विभागात एकूण एक लाख २३ हजार ३१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एक लाख २२ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या मुंबईतून सर्वाधिक आहे. माटुंगा येथील आर. ए. पोदार शाळेतील आशुतोष मोहपात्रा या विद्यार्थ्यांला ९७.६ टक्के गुण मिळाले आहेत तर मानखुर्द येथील केंद्रीय विद्यालयातील धन्या अभिरामी या विद्यार्थिनीला ९७.२ टक्के गुण मिळाले आहेत, तर अंधेरी येथील राजहंस विद्यालयातील निहार राजापूरकर या विद्यार्थ्यांला ९६.६ टक्के गुण मिळाल़े
नव्या प्रणालीचा लाभ
सीबीएसईचे पेपर तपासण्यासाठी यंदा ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली वापरण्यात आल्यामुळे निकाल वेळेपेक्षा आधी लावणे शक्य झाल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. या प्रणालीमुळे तपासणीचे काम अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे.

मी बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. असेच यश बारावीतही मिळवायचे आहे.
    – आशुतोष मोहपात्रा

मला वैद्यकशास्त्रात पदवी घ्यायची आहे. यामुळे विज्ञानाचा अधिक अभ्यास करून बारावीतही चांगले गुण मिळवायचे आहे.
– निहार राजापूरकर