News Flash

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच्या थेट प्रवेशासाठी आता सीईटी!

अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा सुरू करण्याचा विचार शिक्षण मंत्रालयाकडून केला जात आहे.

| February 22, 2015 03:23 am

अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  सीईटी परीक्षा सुरू करण्याचा विचार शिक्षण मंत्रालयाकडून केला जात आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाकडून दोन वर्षांपूर्वी शासनाला सादर करण्यात आला होता. त्यावर आता नव्याने सीईटी घेण्याबाबत आढावा घेण्यात येत असून याबाबतचा निर्णय झाल्यास २०१७ पासून अशी   सीईटी   घेतली जाईल, असे तंत्र शिक्षण मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
डीटीईच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अनुत्तीर्ण झाल्यामुळे चाळीस हजार जागा दुसऱ्या वर्षांसाठी उपलब्ध होतात, तर वीस टक्के हिशेबाने ३२ हजार अशा सुमारे सत्तर हजारांहून अधिक जागा दरवर्षी पदवीच्या दुसऱ्या वर्षांसाठी उपलब्ध होतात. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांसाठी प्रवेश देताना सीईटी परीक्षा देणे अनिवार्य केले पाहिजे, अशी तंत्र शिक्षण संचालनालयाची भूमिका असून त्याबाबतचा अहवाल राज्याच्या तंत्रशिक्षण मंत्रालयाला देऊन दोन वर्षे उलटली आहेत. राज्यातील उद्योगांमध्ये पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पर्यवेक्षक म्हणून मोठय़ा प्रमाणात गरज आहे. तथापि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी प्रवेश घेत असल्यामुळे चांगले पर्यवेक्षक मिळत असल्याची भूमिका औद्योगिक संघटनांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. गंभीर बाब म्हणजे राज्य शासनाने अभियांत्रिकी प्रवेश व सुधारणांसाठी ‘आयसीटी’चे कुलगुरू डॉ. गणपती यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या २१ सदस्यांच्या समितीनेही आपल्या अहवालात पदविका परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी   सीईटी सक्तीची करावी, अशी सुस्पष्ट शिफारस केली आहे. पदवीच्या पहिल्या वर्षांतील गणित या विषयात थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणारे पदविकेचे विद्यार्थी कच्चे राहतात, अशी भूमिकाही मांडली असून याचा परिणाम चांगले अभियंते घडण्यावर होऊ शकतो, असेही नमूद केले आहे. पदविका परीक्षा घेणारी महाविद्यालये अंतर्गत परीक्षेत गुण देताना विशेष मेहरनजर करत असल्यामुळे पदविकेच्या अंतिम वर्षांत त्यांची टक्केवारी वाढते आणि त्याचा फायदा थेट पदवीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेताना होतो, असेही डॉ. यादव समितीने अहवालात म्हटले आहे. या समितीत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक, उपसंचालक, तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव, एआयसीटीईचे सदस्य, व्हीजेटीआयचे संचालक अशी मंडळी असतानाही हा अहवाल दुर्लक्षित होता. आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अभियांत्रिकी शिक्षणातील सुधारणांसाठी पाठपुरावा केल्यानंतर पदविकेसाठी सीईटीला गती मिळू लागली आहे.
राज्यात अभियांत्रिकी पदविकेची ४४२ महाविद्यालये असून सुमारे एक लाख ७३ हजार विद्यार्थी आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निकषानुसार पदविका परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वीस टक्के जागा पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राखीव असून पदवीच्या पहिल्या वर्षांत अनुत्तीर्ण झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी ज्या जागा रिक्त राहतात त्याही पदविकेच्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2015 3:23 am

Web Title: cet for engineering second year admissions
टॅग : Cet,Engineering
Next Stories
1 विशेष विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटरचा फायदा
2 अखेर ४४ शाळांना अनुदान देण्यास पालिका तयार
3 बारावीच्या परीक्षेला राज्यातून विद्यार्थी संख्येत सव्वा लाखाची वाढ
Just Now!
X