परीक्षा व्यवस्थेत ‘पारदर्शकता’ आणण्याचा सल्ला मुंबई विद्यापीठाने जरा जास्तच गांभीर्याने घेतला आहे. परीक्षा व्यवस्थेत नानाप्रकारचे गोंधळ घालणाऱ्या विद्यापीठाने आता चक्क प्रश्नपत्रिका काढणारे, उत्तरपत्रिका तपासणारे आणि मॉडरेटर्सची यादी थेट संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळे या माहितीचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर होण्याची भीती आहे.
कुठल्याही परीक्षेत पेपर सेटर्स (प्रश्निक), परीक्षक व मॉडरेटर्सची माहिती गोपनीय ठेवावी लागते. पण, विद्यापीठाने आपल्या ‘तृतीय वर्ष वाणिज्य पदवी’च्या (टीवाय बी. कॉम) फायनान्शिअल अकाऊंटिंग, मॅनेजमेंट अकाऊंटिंग, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स या विषयांकरिता प्रश्नपत्रिका तयार करणारे (प्रश्निक), उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक तसेच मॉडरेटर्स या सगळ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल ही सारी माहिती थेट आपल्या संकेतस्थळावर जाहीर करून टाकली आहे.
परीक्षेशी संबंधित गोपनीय स्वरूपाची माहिती जाहीर करण्याची पद्धत नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात तर या संबंधात स्पष्ट नियम आहेत. त्यामुळे, विद्यापीठ आणखी किती नवनवीन अनिष्ट प्रथांना जन्म देणार आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांकडून व्यक्त होते आहे.
ही माहिती जाहीर करण्याबरोबरच संबंधित विषयाकरिता परीक्षक नेमण्याच्या पद्धतीवरही प्राध्यापकांनी आक्षेप घेतला आहे. १५ एप्रिलला फायनान्शिअल अकाऊंटिंग, मॅनेजमेंट अकाऊंटिंग, डायरेक्ट अ‍ॅण्ड इनडायरेक्ट टॅक्स या विषयाच्या परीक्षकांची बैठक विद्यापीठाने अचानक बोलाविली. प्र-कुलगुरू नरेशचंद्र, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता मधू नायर, लेखा शास्त्र अभ्यास मंडळाचे सिद्धेश्वर गडदे आदी उपस्थित होते. केवळ चोवीस तास आधी या बैठकीबाबत सूचना आल्याने मुंबई, रायगड वगळता इतर महाविद्यालयातील खासकरून सिंधुदुर्गातील प्राध्यापक या बैठकीला पोहोचू शकले नाहीत.
‘परीक्षकांची यादी तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत केवळ या बैठकीला हजर असलेल्या प्राध्यापकांनाच संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता नेमण्यात आले. तसेच, या विषयांच्या प्रश्नपत्रिका काढणारे, परीक्षक यांची यादी, मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडीसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. ही गोपनीय माहिती या पद्धतीने जाहीर करणे चुकीचे आहे. या यादीचा दुरूपयोग विद्यार्थी करू शकतात. विद्यापीठात सध्या सुरू असलेल्या पेपरफुटीच्या पाश्र्वभूमीवर तर अशा चुका करणे अत्यंत घातक आहे,’ अशी प्रतिक्रिया एका प्राध्यापकाने व्यक्त केली. ‘या यादीवरही प्राध्यापकांचा आक्षेप आहे. यादीतील कित्येक प्राध्यापकांना अध्यापनाचा पुरेसा अनुभव नाही. यापैकी कित्येकांना केवळ एक किंवा दोन वर्षांचा अनुभव आहे. तरीही केवळ या बैठकीला हजर राहिले म्हणून त्यांना उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम सोपविण्यात आले आहे,’ असा आक्षेप एका प्राध्यापकाने घेतला. इतर कुठल्याही विषयांच्या बाबतीत अशा पद्धतीची बैठक घेण्यात आलेली नाही. मग याचा विषयांचा अपवाद का, असा सवाल एका प्राध्यापकाने केला.
‘सिंधुदुर्गातील संबंधित विषयांचे प्राध्यापक या विषयांचे पेपर तपासतात. तसेच, मॉडरेशनही करतात. परंतु, बैठकीच्या माध्यमातून परीक्षक नेमण्याच्या प्रकारामुळे या सत्रात कित्येक जणांना डावलण्यात आले आहे.
प्रत्येक शिक्षक हा परीक्षक असतोच. त्यातून संकेतस्थळावर जाहीर केलेली नावे ही ज्यांनी १५ एप्रिलच्या कार्यशाळेला हजेरी लावली त्या ३७५ शिक्षकांची आहे. ही कार्यशाळा पेपर तपासणीबाबत सूचना देण्यासाठी होती. त्यामुळे, या बैठकीला हजेरी लावणाऱ्यांना परीक्षक म्हणून नेमण्यात आले.
मधू नायर, अधिष्ठाता, वाणिज्य शाखा