कर्मचारी निवड आयोगातर्फे (स्टॉफ सिलेक्शन कमिशन) विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी मुंबईच्या विद्यार्थ्यांना चक्क चंद्रपूरचे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने बुधवारी परीक्षार्थीमध्ये गोंधळ उडाला आहे. नाशिक, औरंगाबाद यांसारखी परीक्षा केंद्रे असतानाच चक्क चंद्रपूर परीक्षा केंद्र देण्यात आल्याने या परीक्षार्थीनी याविरोधात नाराजी व्यक्त करीत कर्मचारी निवड आयोगाने लक्ष घालून मुंबईच्या जवळपास परीक्षा केंद्र देण्याची मागणी हजारो परीक्षार्थीनी बुधवारी केली आहे.
कर्मचारी निवड आयोगातर्फे येत्या १९ आणि २६ ऑक्टोबरदरम्यान ‘ब’ श्रेणीच्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. प्राप्तिकर निरीक्षक, उत्पादन निरीक्षक यांसारख्या विविध पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातून साधारणपणे दोन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
 बुधवारी या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यानुसार ज्या परीक्षार्थीनी मुंबई परीक्षा केंद्र म्हणून निवडले होते, त्यांना चक्क चंद्रपूरचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तर पुणे परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना गोव्याचे परीक्षा केंद्र देण्यात आलेले असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या संदर्भात बोलताना एका परीक्षार्थीने सांगितले की, मुंबई ते चंद्रपूर या माग्रे मुंबईहून एकही ट्रेन नाही. जर प्रवास करून जायचे म्हटले तर साधारणपणे चार दिवसांचा अवधी आमच्या हातात असणे गरजेचे आहे. त्यासाठी साधारणपणे चार ते पाच हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जो अनेकांसाठी शक्य नसून त्यामुळे या परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी हजर राहणार नाहीत, हे मात्र नक्की. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन परीक्षा केंद्र बदलण्यात यावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. महाराष्ट्राच्या मुलांना या परीक्षेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असून याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आवाज उठविणार आहे.
 नाशिक, औरंगाबाद अशी परीक्षा केंद्रे न देता चंद्रपूरच का देण्यात आले, या संदर्भात आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनशी पत्रव्यवहार करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.