मुले देवाघरची फुले मानली जातात. ही फुले वाढविताना त्यांना योग्य वेळी पाणी, हवा, पुरेशी मोकळीक दिली नाही, तर ती फुले बनण्याच्या अगोदरच कोमेजून जातील. म्हणून केवळ घोकंपट्टीवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना, त्यांच्यातील क्रीडाकौशल्यांना जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न नंदुरबारच्या ‘श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल’मध्ये केला जातो.
आदिवासी भागातील या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना वाव दिला जातो. शाळेत प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळील दोन्ही बाजूंना लावलेले फलक याचीच ग्वाही देतात. १९७० पासून आजपर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या क्रीडा सहभागाची मोठी गुणवत्ता यादीच या ठिकाणी पाहायला मिळते.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाबरोबरच दर वर्षी शाळा विज्ञान प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम घेते. तसेच ‘नई उडान’ नामक भित्तिपत्रकावर विद्यार्थ्यांनी संकलित केलेली माहिती, कात्रणे, शास्त्रज्ञांची माहिती लावली जाते. या उपक्रमांतून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे गेल्या वर्षी ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ या केंद्र सरकारच्या विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या राहुल बागुल नामक विद्यार्थ्यांला पश्चिम महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावण्यात यश आले.
शाळेच्या हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ओझोन दिनाच्या दिवशी २१० झाडांचे रोपण केले, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.
या वर्षीपासून शाळेने ई-क्लास ही नवी संकल्पना अमलात आणली. प्रोजेक्टरच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले जाते. दृक-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण चिरकाल टिकणारे असते. त्यामुळे किचकट विषयही सोपे होण्यास मदत होते.
शालेय दशेपासून विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी वेळोवेळी विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना बोलाविले जाते आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या संस्थांकडून शाळेत स्पर्धाचे आयोजनही केले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कल या परीक्षांकडे वाढावा.आज मराठी शाळेचे सर्वानाच वावडे आहे. इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत असतानाही ही शाळा आपले स्थान टिकवून असून मुलांना संजीवनी पुरविण्याचे काम अखंडपणे करते आहे.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखाळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com