News Flash

‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे कराडमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. याच संस्थेच्या कार्वे या कृष्णाकाठी वसलेल्या छोटय़ाशा गावातील श्री शिवाजी

| April 21, 2013 03:42 am

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे कराडमध्ये श्री  शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. याच संस्थेच्या कार्वे या कृष्णाकाठी वसलेल्या छोटय़ाशा गावातील श्री शिवाजी विद्यालय ही शाळा.
 शिवाजी विद्यालयात येणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील, शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत. त्यांना संस्कारक्षम बनवून शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने पुढे नेणे हे शाळेचे ध्येय आहे. त्यासाठी शाळेतून अनेक उपक्रम राबविले जातात.
‘स्वच्छ-शाळा सुंदर शाळा’ हा पुरस्कार विद्यालयाला सलग तीन वर्षे मिळाला आहे. शालेय परिसर विद्यार्थ्यांकडून स्वच्छ ठेवला जातो. त्यासाठी प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थी स्वच्छतादूत म्हणून काम करतात. विशेष म्हणजे ओला कचरा व सुका कचरा असे दोन डबे प्रत्येक वर्गात ठेवले जातात. शालेय क्रीडांगणावर ही अशी सोय केलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआपच ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवायची सवय लागते. ओल्या कचऱ्यापासून आमच्या विद्यालयात ‘गांडूळ खत प्रकल्प’ राबविला जातो. याचा फायदा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना जास्त होतो.
‘सुंदर हस्ताक्षर’ हे आमच्या विद्यालयाचे वैशिष्टय़. विद्यार्थ्यांना सक्तीने शाईपेनच वापरावे लागतात. त्यासाठी नवीन आलेल्या इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांना ‘नवागतांचे स्वागत’ या कार्यक्रमावेळी प्रत्येकाला एक शाईपेन दिले जाते. त्यांचे ‘बॉलपेन’ काढून घेतले जातात. त्यामुळे विद्यालयात कुणीही बॉलपेनचा वापर करीत नाही. वर्ग प्रतिनिधीला सांगून प्रत्येकाला रोज पाच ओळी शुद्धलेखन करायला सांगितले जाते आणि हे लेखन रोज मधल्या सुट्टीमध्ये आमचे कलाशिक्षक तपासतात व अक्षरांची वळणं समजावून देतात. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाचा नेहमी पहिला क्रमांक असतो. विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरांचा परिचय व्हावा यासाठी प्रत्येक वर्षी ‘सुंदर हस्ताक्षर प्रदर्शन’ भरविले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे प्रदर्शन भरविले जाते.
श्रमदान :
 प्रत्येक शनिवारी एका वर्गाकडून शालेय परिसर स्वच्छ करून घेतला जातो. गावातील स्वच्छताही विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते, तसेच वर्गातील विद्यार्थ्यांची स्वच्छता, आरोग्य तपासणी वर्गशिक्षकांकडून केली जाते. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता यांचे संस्कार विद्यालयातून केले जातात. ज्या ठिकाणी छोटी परिसर भेट असते, तेथील परिसरही विद्यार्थ्यांकडून स्वच्छ केला जातो.
वेगळा उपक्रम :
आपल्या घराशेजारी :- विद्यार्थी आत्मकेंद्री न होता समाजात मिसळला पाहिजे. आपल्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जातो. विद्यार्थी आपल्या घराशेजारी असणाऱ्या घरात आठवडय़ातून एकदा तरी जातोच, जात नसेल तर त्याने एकदा तरी गेले पाहिजे. त्या वेळी त्यांच्याशी सुसंवाद साधून विद्यालयात जे काही चांगले सांगितले जाते, ते त्यांनी आपल्या शेजारच्या घरात जाऊन सांगायचे. उदा. पाणी काटकसरीने वापरा, विजेची बचत करा, मोटारसायकलपेक्षा सायकलचा वापर जास्त करा, परिसर स्वच्छ ठेवा इ. त्यामुळे घरोघरी चांगले संदेश सहज पोहोचविले जातात. पालकांना, ग्रामस्थांना विद्यालयात काय सांगितले जाते याची माहिती मिळते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शेजारच्यांशी चांगली ओळख होते. यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. या कामासाठी विद्यार्थ्यांना गुण ठेवले आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मनापासून या उपक्रमात सहभागी आहे. या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी फार कौतुक केले आहे.
पत्रलेखन प्रकल्प :
 मोबाइलमुळे पत्रलेखन कसे करावे, नाती कशी जोडावीत, हेच विद्यार्थ्यांना समजत नाही. भाषा विषयापुरते पेपरमध्ये पत्रलिखाण इतकेच मर्यादित राहिले आहे हे ओळखून पत्रलेखन प्रकल्प सुरू केलेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेकडून  पोस्ट कार्डस् पुरविली जातात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामस्थ, पालक, प्रतिष्ठित नागरिक यांना नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात. या पत्रांचे प्रतिउत्तर विद्यार्थ्यांना येते त्या वेळी ते पत्र शोकेसमध्ये लावले जाते. यामुळे आपुलकीचे नाते निर्माण होते.
दत्तक झाड पालक योजना :  प्रत्येक विद्यार्थ्यांला झाडं लावण्यासाठी दिली जातात, पण ठरावीक विद्यार्थीच झाडांचे संगोपन चांगल्या प्रकारे करतात. अशा मुलांना झाड दत्तक दिले जाते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांला झाडाचे पालकत्व स्वीकारावे लागते. त्यांनी आपल्या शेतात अगर घराच्या परिसरात झाड लावून त्याची योग्य जोपासना करायची. पालक गृहभेटीच्या वेळी शिक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाते. त्यामुळे विद्यार्थी झाडाची खूप काळजी घेताना दिसतात. लहान वयातच त्यांना वृक्षप्रेम वाढीस लागते हा फार मोठा फायदा या उपक्रमातून दिसून आला.
चांगल्या पुस्तकांचा परिचय-  
प्रत्येक शिक्षकांनी दर बुधवारी प्रार्थनेच्या वेळी आपण वाचलेल्या चांगल्या पुस्तकांचा परिचय करून देऊन त्यातील निवडक प्रसंगाचे कथन करावयाचे, जेणेकरून ते पुस्तक विद्यार्थ्यांला वाचण्याची प्रेरणा मिळेल.  रात्र अभ्यासिका असून त्यासाठी शिक्षक थांबतात व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मुलींसाठी सकाळी ८ ते १० अशी अभ्यासिकेची वेळ आहे. शालेय परिसरातील वातावरण आनंददायी तर आहेच, पण अनेक उपक्रमांमुळे ते सुंदरही आहे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत करतात. विशेषत: विद्यालयात येणारी ‘गोपाळ’ समाजातील मुलं ही मनापासून शिक्षण घेतात हे आमच्या विद्यालयाचे वैशिष्टय़ आहे. कारण त्यांना सवरेतोपरी संस्था पातळीवर, शालेय पातळीवर वैयक्तिक मदत केली जाते. त्यांना घरी जाऊन शाळेत आणावे लागते. शिक्षणापासून वंचित राहणारा एक घटक आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. हेच आमच्या कामाचे मूल्यमापन आहे.
उपशिक्षिका, कार्वे  (मो.) ९९७५३३०८०१
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट,            मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 3:42 am

Web Title: clean school beautyful school
Next Stories
1 अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जेदार पर्याय : एनआयटी
2 अंतराळात झेप घ्या!
3 संशोधनाच्या संधी
Just Now!
X