रेव्ह पार्टी तर दूरच; पण महाविद्यालयाच्या परिसरात मद्यसेवन व धूम्रपानासही बंदी असते. त्यामुळे, रेव्ह पार्टी, व्हॅलेंटाइन डे सारख्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्याबाबत महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे सल्ले देण्याची कृती ही राज्य सरकारची नसती उठाठेव आहे, असा सूर महाविद्यालयांच्या प्राचार्यामधून उमटतो आहे.
तरुणांमध्ये साजरे होणारे व्हॅलेंटाइन डे, रेव्ह किंवा मद्यपानाच्या पाटर्य़ा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. म्हणून, तरुणांना यामध्ये गुंतविणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा देऊ नये, अशा अर्थाचे परिपत्रक उच्च शिक्षण संचालकांमार्फत राज्यातील विद्यापीठांना पाठविण्यात आले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल, याबाबत उपाययोजना करण्याची गरज सरकारला वाटू शकते. त्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठे यांना लक्ष्य करून सूचना करण्याची गरज एकवेळ समजू शकते. पण, व्हॅलेंटाइन डे, रेव्ह पाटर्य़ा तर दूरच; पण मद्यसेवन किंवा धूम्रपानालाही महाविद्यालयाच्या परिसरात थारा दिला जात नाही. परिणामी या प्रकारची अर्थहीन परिपत्रके पाठविण्याचे कारण काय, असा सूर प्राचार्यामधून उमटतो आहे.
‘आंतरमहाविद्यालयीन महोत्सव किंवा विशेष दिन या व्यतिरिक्त कोणतेही दिवस आम्ही साजरे करीत नाही. महाविद्यालयात शिस्तीचे पालन व्हावे, याकडे आमचा कटाक्ष असतो, ती आमची जबाबदारीही आहे. पण, महाविद्यालयाबाहेरच्या सुरक्षेचे काय,’ असा सवाल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी केला.