News Flash

वाणिज्य शाखेचा निकाल घसरला

‘तृतीय वर्ष वाणिज्य पदवी’ (टीवायबीकॉम) अभ्यासक्रमाच्या निकालाला आलेली सूज यंदा अखेर उतरली आहे.

| June 28, 2015 06:35 am

गेली दोन वर्षे अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली महाविद्यालयांकडून करण्यात येणाऱ्या गुणांच्या लयलुटीमुळे ‘तृतीय वर्ष वाणिज्य पदवी’ (टीवायबीकॉम) अभ्यासक्रमाच्या निकालाला आलेली सूज यंदा अखेर उतरली आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी ७३ टक्क्य़ांच्या आसपास लागलेला टीवायबीकॉमचा निकाल यंदा ६७.३ टक्के असा खाली आला आहे.
गेली तीन वर्षे मुंबई विद्यापीठ बीकॉम परीक्षा पध्दतीत सातत्याने बदल करते आहे. २०१३मध्ये थेट तृतीय वर्षांला ६०-४० असा अनुक्रमे लेखी आणि अंतर्गत मुल्यांकनाचा पॅटर्न लागू आधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (तोपर्यंत टीवायबीकॉमच्या प्रत्येक विषयाकरिता १०० गुणांची लेखी परीक्षा होती) त्याच वर्षी पहिल्या प्रथम वर्षांला श्रेणी पध्दतीनुसार ६०-४० असा पॅटर्न राबविण्यात आला. अंतर्गत मुल्यांकनाला ४० टक्क्य़ांचे वजन आल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांची उधळण केली होती. त्यामुळे, ६० टक्क्य़ांच्या आसपास असलेला टीवाबीकॉमचा निकाल २०१३मध्ये सुमारे २० टक्क्य़ांनी (८१.५३टक्के) वाढला. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अतिप्रचंड म्हणजे ३९,६२८ इतकी होती. हा एक प्रकारचा विक्रम होता.
अंतर्गत मूल्यांकनात महाविद्यालयांनी ‘वाटलेल्या’ गुणांमुळे निकालावर आलेली ही कृत्रिम सूज विद्यापीठानेही अप्रत्यक्षपणे मान्य केली. त्यावर उपाय म्हणून अंतर्गत मूल्यांकनाचे गुण ४०वरून २५ करण्यात आले. अंतर्गत मुल्यांकनाचे गुण कमी केल्याने २०१४मध्ये निकाल ७३.७१ टक्के असा घसरला. तरिही निकालावरची कृत्रिम सूज कायम होती. त्यावर उपाय म्हणून लेखी परीक्षेच्या तुलनेत अंतर्गत मुल्यांकनाचे गुण देण्याची नवी पध्दती विद्यापीठाने आणली. परिणामी यंदाच्या वर्षी निकाल आणखी सुमारे सहा टक्क्य़ांनी खाली आला आहे. ‘टीवाबीकॉमचा वाढलेला निकाल आता पूर्वपदावर येतो आहे. यंदा तो पूर्वीप्रमाणे सरासरी ६० ते ६२टक्क्य़ांच्या आसपास आला आहे,’ असे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता मधू नायर यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांतील निकाल
’२०१३ – ८१.५३टक्के
’२०१४ – ७३.७१टक्के
’२०१५ – ६७.३ टक्के

विषयनिहाय गुण मंगळवापर्यंत
मुंबई विद्यापीठाचा सर्वाधिक मोठा निकाल म्हणजे टीवायबीकॉम. दरवर्षी ६० हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. परंतु, शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठातर्फे ऑनलाईन जाहीर झालेल्या या निकालाने विद्यार्थी-पालकांची मोठी निराशा केली. निकाल पाहण्यासाठी मोठय़ा अपेक्षेने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गेलेल्यांना केवळ उत्तीर्ण-अनुत्तीर्ण इतकेच काय ते कळत होते. त्यावर विषयनिहाय गुण मांडणीचे काम सुरू असून  मंगळवापर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण पाहता येतील, अशी माहिती नायर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 6:35 am

Web Title: commerce faculty result mumbai university
Next Stories
1 मुदत ठेवी काढून घेणाऱ्या संस्थांना केंद्रीय प्रवेश फेरीतून वगळणार
2 ‘तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नुकसानीला शिक्षणमंत्री जबाबदार
3 राज्यपालांच्या आदेशांची वेळूकरांकडून उपेक्षाच!
Just Now!
X