महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करताना केवळ ‘वॉक इन इंटरव्ह्यू’चा पर्याय मोडीत काढून यापुढे स्पर्धात्मक परीक्षांद्वारे शिक्षकभरती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बुधवारी, स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी शिक्षकांच्या शिकवणीच्या अजब तऱ्हा वर्णन केल्यावर याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली.  बोली भाषेतील तसेच संकल्पना समजावून सांगण्याच्या पद्धतीतील फरकामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे नगरसेवकांनी दिली. त्यामुळे स्थानिकांनाच शिक्षकभरतीत प्राधान्य देऊन उर्वरित जागा इतरांसाठी खुल्या करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी असा निर्णय घेतला होता. मात्र उच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोणत्याही व्यक्तीला इतर शहरातील नोकरीसाठी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य आहे.
पालिकेत केवळ ‘वॉक इन इंटरव्ह्यू’मधून शिक्षकांची नेमणूक केली जाते. ही पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षाद्वारे शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केले. पालिका शाळातील सुमारे सहाशेहून अधिक पदे रिक्त आहेत.