अधिव्याख्याता आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशीप पदांसाठी (जीआरएफ) २०१२मध्ये घेण्यात आलेल्या ‘नेट’ या पात्रता चाचणीमुळे निर्माण झालेला गोंधळ निस्तरण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा झाला आहे. ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) २४ जूनला झालेल्या नेट परीक्षेचा ‘पुरवणी’ निकाल नुकताच घोषित केला असून यात अधिव्याख्याता आणि जीआरएफसाठी मिळून आणखी तब्बल १५,१७८ उमेदवारांना पात्र ठरविले आहे. परंतु, पुरवणी निकालात इतके उमेदवार पात्र ठरविताना नेमके कोणते निकष ग्राह्य़ धरण्यात आले आणि कटऑफ नेमकी किती खाली आणण्यात आली याचा खुलासा यूजीसीने न केल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाबरोबरच नाराजीचीही भावना आहे.
प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ करून २०१२च्या नेट परीक्षेचे स्वरूप यूजीसीने आमूलाग्र बदलले. याचबरोबर अधिव्याख्याता व जीआरएफसाठीच्या पात्रता निकषांमध्येही बदल करण्यात आले. उदाहरणार्थ अधिव्याख्याता पदाच्या एकूण ३५० गुणांच्या परीक्षेसाठी उमेदवारांना १००, १०० आणि १५० गुणांचे तीन पेपर द्यावे लागले. परीक्षेची घोषणा करताना यूजीसीने पात्रता निकषांचीही घोषणा केली. या नुसार खुल्या गटातील उमेदवारांचे या तीन पेपरमध्ये अनुक्रमे किमान ५०, ५० आणि ७५ गुणांचे प्रश्न बरोबर असणे आवश्यक होते. प्रत्यक्षात निकाल जाहीर करताना यूजीसीने हे नियम गुंडाळून ठेवले. नव्या निकषांनुसार तिन्ही पेपरांमध्ये मिळून (अ‍ॅग्रीगेट) किमान ६५ टक्के गुण मिळविणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांनाच पात्र ठरविण्यात आले. तर इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती, जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा विकलांग यांना अनुक्रमे ६० व ५५ टक्के गुणांचे निकष लावण्यात आले. पण यामुळे आधीच्या निकषांनुसार अभ्यास केलेल्या उमेदवारांची अडचण झाली. देशभरातून पाच लाख ७१ हजार उमेदवार या वर्षी नेटला बसले होते.
नव्या निकषांनुसार यूजीसीने १८ सप्टेंबरला जो निकाल जाहीर केला त्यात ४०,३३२ उमेदवार अधिव्याख्याता आणि ३,६२५उमेदवार जीआरएफसाठी पात्र ठरविण्यात आले. या निकालावर देशभरातील उमेदवारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. परीक्षेबरोबरच निकाल लावताना केलेल्या अभूतपूर्व गोंधळावर सर्व स्तरातून टीका झाल्यावर यूजीसीने एका त्रिसदस्सीय समितीची नियुक्ती करून या तक्रारींचा आढावा घेतला आणि १२ नोव्हेंबरला २०१२च्या नेट परीक्षेचा पुरवणी निकाल घोषित केला.
यात अधिव्याख्याता पदासाठी १३,४९३ आणि जीआरएफसाठी १,६८५ मिळून १५,१७८ उमेदवार पात्र ठरविण्यात आले. परंतु, हे उमेदवार पात्र ठरविताना ‘कटऑफ’ नेमकी किती खाली आणली गेली याचा काहीच खुलासा यूजीसीने केलेला नाही. परीक्षा घेण्यापासून निकाल लावेपर्यंत यूजीसीने सर्व स्तरावर गोंधळ घालून आमची फसवणूक केली आहे, अशा शब्दांत रूपेश मोरे या उमेदवाराने संताप व्यक्त केला.