बारावीतील विद्यार्थ्यांंना चुकीचे वेळापत्रक वितरित करुन त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील खासगी शिकवणी चालक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे आणि बीडमध्ये शिकवणी चालकांनी दिलेल्या चुकीच्या वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते.
पुण्यातील भुजबळ क्लासेसच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत ‘बारावीनंतर पुढे काय’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक वाटण्यात आले होते. वेळापत्रकात भूगोल विषयाच्या परीक्षेची वेळ चुकीची छापण्यात आली होती. राज्यमंडळाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात होणाऱ्या परीक्षेची वेळ दुपारी ३ ते ६ अशी वेळापत्रकात छापण्यात आली होती.