भारतीय उत्कर्ष मंडळाच्या विविध प्रकल्पांपैकी एक प्रकल्प, भविष्यातील सुसंस्कृत सुजाण नागरिक घडवणारा प्रकल्प म्हणजेच ‘उत्कर्ष विद्या मंदिर.’
शहरी वातवारणापासून दूर निसर्गरम्य परिसरातील शाळेची वास्तू. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणारा प्रकल्प. समाजसेवेचे व्रत स्वीकारलेलं हे विद्यालय एका तपापासून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करते. योग, स्तोत्र मंत्र, ध्यान, प्राणायाम यापासून तर ग्रामीण भागात असूनही संपूर्ण संस्कृत हे वैशिष्टय़ जपणारी ही शाळा. आज शाळेत ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रीडा दिन, संस्कृत दिन, शाळा व मंडळाच्या संयुक्तविद्यमाने साजरा होणारा गोपूजन उत्सव, गणेशयाग, भारतमाता पूजन इत्यादी कार्यक्रम म्हणजे समाज-पालक-शाळा-संस्था-शिक्षक-विद्यार्थी यांच्या एकसूत्रतेचे प्रतिबिंब होय. अशा विविध उपक्रमांबरोबरच खेडय़ांतून साजरा केला जाणारा शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरा केलेला रक्षाबंधन कार्यक्रम, मातृमेळावा, गुढीपाडवा म्हणजे शाळेचा गावातील पालकांशी असणारा अतूट नात्याचा धागा आहे.  
विद्यार्थ्यांच्या अध्ययनास आवश्यक अशी सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनाची गोडी वाढावी म्हणून २००० पुस्तकांचा खजिना असणारे वाचनालय, सुसज्जचा संगणक कक्ष शाळेने तयार केला आहे. भारतीय संस्कृतीचे धडे देणारे शिक्षण देण्यासाठी म्हणून संस्कृती ज्ञान परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा राहावा, यासाठी मंडळाद्वारे विविध प्रशिक्षणाच्या सोयी करण्यात आल्या आहेत. एम.एस.सी.आय.टी.चा संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम मंडळाने उपलब्ध करून दिला आहे. मंडळाद्वारे गोशाळा चालविली जात असून त्या ठिकाणी गांडुळ खतनिर्मिती, गोअर्क इत्यादी तयार करण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. गोग्रासच्या निमित्ताने वर्षभरात एका गाईचा खर्च जमा करण्यासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने पुढे येतात. स्वत:च्या वाढदिवसाला व अन्य विशेष दिनाचे औचित्य साधून दानपेटीत दान टाकून समाजकार्यात खारीचा वाटा उचलतात. शेती व वनौषधी प्रकल्पातही विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. याच परिसरात स्वामी विवेकानंद आरोग्य केंद्र चालविले जात असून आरोग्य विभागाला लागणारी आवश्यक कागदी पाकिटे तसेच शाळेला लागणारा खडू विद्यार्थी तयार करतात. या उपक्रमात भारतीय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गुणवंतराव पांडे, सचिव अतुल मोहरीर, शाळा समितीचे अध्यक्ष यशवंत खारपाटे, अनिल बाराहाते तसेच शाळेचे प्रधानाचार्य नितीन धनवंत यांचा मोलाचा वाटा आहे.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता-
‘चिरंतन शिक्षण’
लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट,            
मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com