व्यावसायिक अभ्यासक्रमांना वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठीची मुदत आता ३१ मेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
‘एमबीए’ तसेच अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी जातो. पण तंत्र शिक्षण संचालनालयाने हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघी दहा दिवसांची मुदत दिली होती. संचालनालयाच्या या जाचक अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती होती.
ही मुदत गुरुवारी संपत होती. विद्यार्थ्यांनी ही अडचण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यापुढे मांडली. यावेळी त्यांनी या संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाशी चर्चा करून ही मुदत वाढविण्याची मागणी केली. यानुसार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येणार असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.