राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकलेल्या २२ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना द्यावेत अशी जोरदार मागणी बुधवारी विधानसभेत करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत गटनेत्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिले.
आयोगाच्या घोटाळ्याचा विद्यार्थ्यांना त्रास का, असा सवाल करीत चुकलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना द्यावेत आणि त्यांना पुन्हा मुलाखतीसाठी बोलवावे अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. त्यावर पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर मुख्य परीक्षेत खुल्या प्रवर्गात ४५ टक्के तर मागास प्रवर्गात ४० टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानुसार ७४ पदांसाठी ८८ उमेदवारांना  मुलाखतीसाठी बोलावून त्यातून पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली. तसेच परीक्षेत चुकलेले २२ प्रश्न रद्द करून ६०० ऐवजी  ५७८ प्रश्नांचा विचार करून गुणवत्तायादी तयार करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली.