‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तर्फे (एमपीएससी) २०१४मध्ये होणाऱ्या ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षे’साठीच्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार या संवर्गातील पदांचा समावेश करण्यात आल्याने राज्यातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीने २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी १६ डिसेंबरला जाहिरात दिली होती. केवळ पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, कक्ष अधिकारी आदी विविध ‘गट अ’ आणि ‘गट ब’ दर्जाच्या १०४ पदांकरिता ही परीक्षा होणार आहे. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे या जाहिरातीत एकाही तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी पदाचा समावेश नाही. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांची कमालीची निराशा झाली होती.
सामान्य प्रशासन आणि महसूल विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे सलग दुसऱ्या वेळी या पदांचा समावेश न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या आधीच्या भरती प्रक्रियेतही ही पदे नव्हती. त्यामुळे सेवाभरतीकडे डोळे लागून राहिलेल्या राज्यातील हजारो उमेदवारांची निराशा झाली होती. नियमाप्रमाणे परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर एमपीएससी नव्या पदांचा समावेश करू शकते. त्याप्रमाणे २०१४च्या उपजिल्हाधिकारी पदाच्या ४४ आणि तहसिलदार पदांच्या ३१ जागांसाठी मागणीपत्रक शासनाकडून प्राप्त झाल्याने या पदांचा राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०१४ मध्ये समावेश करण्यात आला आहे. सलग दोन वर्षे या दोन महत्त्वाच्या पदांची भरती न झाल्याने ज्यांचे वय काठावर आहे, त्यांची संधी कायमची हिरावली जाण्याची शक्यता होती. शिवाय सरकारी सेवेत असलेले अनेकजण सुट्टय़ा घेऊन या परीक्षेच्या अभ्यासाला लागले होते. त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.