18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कला उतरविताना

'कला' या विषयाचे मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलुंड विद्या मंदिर शाळेतील कला शिक्षिकेने केलेल्या

अरुणा इनामदार -कलाशिक्षिका | Updated: November 25, 2012 5:10 AM

‘कला’ या विषयाचे मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलुंड विद्या मंदिर शाळेतील कला शिक्षिकेने केलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगांविषयी..
कला हा विषय वेगळ्या पद्धतीने, मुलांना आकर्षक वाटेल असे, समरसून जाता येईल अशा पद्धतीने शिकविण्याचा नव्हे मुलांमध्ये उतरविण्याचा प्रयत्न असतो. रंग, रेषा, आकार, पोत ही चित्रकलेद्वारे अभिव्यक्ती करण्याची साधने आहेत. मुले शाळेत भाषासुद्धा शिकतात. भाषेची गणना मुले घोकंपट्टीच्या विषयांमध्ये करतात, हे नेहमीच खटकायचे. भाषा हेदेखील अभिव्यक्तीचे माध्यम आहे. शब्द, अर्थछटा, यमक हीसुद्धा रंग, रेषा, आकार, पोत यांप्रमाणे त्यांच्याशी मुक्तपणे खेळत खेळत शिकण्याची साधने आहेत. आपण मातृभाषेच्या माध्यमातून शिकतो याचा हाच तर केवढा मोठा लाभ आहे. यासाठी दरवर्षी काही आगळेवेगळे पाठ घेते. यात मुलांना चित्र काढण्याबरोबरच त्यावर छोटीशी कविताही करायला सांगते. त्यांना सोप्या प्रकारे यमक जुळविणे किंवा ते नाही जमले तर शब्दांशी फक्त खेळायचे असे प्रोत्साहन दिल्यावर सगळे उत्साहाने कविता करतात. काहींची कविता लगेच होते. म्हणून दाखवतात. ‘वा.छान’ म्हणायचे. मग तीन-चार आठवडे कवितांचा पाऊस पडतच राहतो.
या कविता चित्रकलेच्या वहीत लिहायच्या व साजेसे चित्रही काढायचे. मग एक दिवस चित्रकलेच्या तासाला या चित्रकवितांचा सादरीकरणाचा कार्यक्रम होतो. चित्रे भिंतीवर प्रदर्शित करायची व त्यावरील कविता चाल लावून सर्वासमोर म्हणायच्या. वाद्य शिकणारी मुले त्याला वाद्यसाथही करतात. काहींचे गद्यकाव्यही असते. तेही चालते. कारण आत्मविश्वासाने अभिव्यक्ती करता येणे महत्त्वाचे. आपण चित्र काढतो व कविताही करतो याचा केवढा आनंद मुलांना होतो. यात विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे सादरकर्ते मुले आणि प्रेक्षकही मुलेच.
निवेदन, ते लिहून काढणे, कवितेला चाल लावणे, त्याची तयारी, चित्रे भिंतीवर लावणे, ज्याला जे येते ते त्याने करावे. यात त्यांच्या नियोजन कौशल्याला वाव देणे, प्रत्येक गोष्टीत मदत, प्रोत्साहन देणे, आत्मविश्वास व आत्मसन्मान देणे हे काम फक्त माझे. दुसऱ्यांनी केलेल्या कविता मुलांनी वाचणे, ऐकणे हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट साध्य होते. त्यानिमित्ताने मुले कविता या प्रकाराकडे आवडीने बघतात.
असाच पण थोडासा वेगळा प्रयोग म्हणजे मुलांनी एखाद्या प्रसिद्ध कवीने केलेली कविता मिळवायची आणि ती लिहून त्यावर एक चित्र तयार करायचे. या चित्रकाव्याच्या निमित्ताने मुले आवडीने अवांतर कवितावाचन करतात, नामवंत कवींचे कवितासंग्रह धुंडाळतात.
बुकमार्क तयार करणे हा आणखी एक मुलांनी काढलेल्या चित्रांना उपयुक्ततेची जोड देणारा आवडता पाठ. त्यामुळे वाचन, साहित्य, त्यातील प्रकार यांच्याशी जवळीक निर्माण होते. पुस्तकात ठेवण्याची खूण म्हणून बुकमार्क हा एखादा विषय देऊन त्यांच्याकडून करून घेते. हे विषय कधी काव्याला चित्ररूप देणारे असतात तर कधी पर्यावरण इत्यादी असतात. यात चित्राला समर्पक असे एखादे घोषवाक्य असते किंवा संदेश असतो. त्यामुळे मुलांच्या अक्षरलेखन कलेलाही प्रोत्साहन मिळते. मुलांनी तयार केलेल्या बुकमार्क्‍सचा उपयोग आम्ही मराठी दिनानिमित्त पाहुण्यांना व शिक्षकांना फुले देण्याऐवजी केला.
कला हाच विषय नावीन्यपूर्ण रीतीने मुलांसमोर ठेवल्यावर त्यांच्या उत्साहाला उधाण येते. ती कृतिशील बनतात. खोक्याची सजावट हादेखील असाच एक प्रयोग. चित्रकलेची वही, रंग बरीच मुले आणत नाहीत. घरची परिस्थिती नसते त्यामुळे पालक यावर खर्च करीत नाहीत. म्हणून चित्रकला वहीच्या बाहेरील असा टाकाऊतून टिकाऊ प्रयोग राबविला. साबण, चहा, चॉकलेट, औषधे यांचे मिळतील ते लहान आकाराचे खोके आणावयास सांगितले. रंगीबेरंगी आकर्षक असे खूप खोके मुलांनी आणले. त्यांना रंगीत कागद किंवा रंगीत चित्र काढून ती चिटकवून खोके सजविण्यास सांगितले. मुलांनी कल्पकता वापरून पेन-पेन्सिल स्टँड, लेटरबॉक्स, मोबाईल स्टँण्ड अशा विविध उपयोगाच्या आकर्षक व सुंदर वस्तू यातून बनविल्या. मुलांना कलेची दृष्टी देणे, कोणत्याही घटनेकडे वा वस्तूकडे बघण्याचा सौंदर्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करणे हा हेतू या प्रयोगांतून साध्य होतो.

First Published on November 25, 2012 5:10 am

Web Title: different type of art project from mulund vidya mandir