निवडणुका परीक्षेच्या कालावधीत घेऊन करोडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने बुधवारी निडणूक आयोगाला पत्राद्वारे केले आहे.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकांच्या कामातून वगळण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरही शिक्षकांना निवडणूक कामासंदर्भातील पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रासंदर्भात बुधवारी राज्य मुख्याध्यापक महामंडळाची पुण्यात तातडीची बठक झाली. या वेळी महासंघातर्फे राज्य निवडणूक आयुक्तांना निवडणुकीच्या कामांमुळे बारावी तसेच शालेय परीक्षांचे व्यवस्थापन कोलमडल्याबाबत निवेदन पाठविण्यात आले. राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्र्यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल उशीरा लागला तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होतो. निवडणूक कामांमुळे शाळेत कर्मचारीच राहिलेले नाहीत. आम्ही आमच्या शाळेचे पदवीधर माजी विद्यार्थी या कर्मचाऱ्यांना बदली म्हणून देण्यास तयार असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्याचे महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. एका शिक्षकाला एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी १२ ते १५ मिनिटांचा अवधी लागतो. एका शिक्षकाला आठ दिवसांमध्ये २५० उत्तरपत्रिका तपासायच्या असतात. यामुळे त्यांना दिवसाला किमान ३२ उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. निवडणुकांच्या कामांमध्ये पाच ते सहा दिवस गेले तर तेवढय़ा दिवसांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्याही हालचाली
मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांचे काम करणाऱ्या शिक्षकांना तसेच परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विद्यापीठातर्फे आयोगाला पाठविण्यात आले आहे. परीक्षा विभागातील १३० कर्मचाऱ्यांना निवडणुकांचे काम लावण्यात आले आहे. यामुळे परीक्षा विभागात परीक्षेशी संबंधित काम कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाचे पत्र आले असून विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक व परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामातून वगळण्याची विनंती आयोगाला केल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. प्रज्ञा देशमुख यांनी दिली.
मोते यांचा इशारा
निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीच्या विरोधात शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही निषेधाचा झेंडा फडकविला असून ही अरेरावी थांबली नाही तर निवडणुकांच्या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा त्यांनी दिला आहे.