शिक्षकांचे वेतन ज्या ‘शालार्थ’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अदा केले जाते ती यंत्रणा सध्या बंद असल्याने राज्यातील सहा लाख शिक्षकांना पुढील वेतनासाठी वाट पाहावी लागणार आहे. ही यंत्रणा पुरविणाऱ्या खासगी कंपनीची बिले राज्य सरकारने अदा न केल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे, ‘शालार्थ’च्या ‘ऑनलाइन’ऐवजी शिक्षकांना ‘ऑफलाइन’ वेतन अदा करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
शिक्षकांच्या वेतनासाठीचे देयके महिन्याच्या ७ तारखेच्या आत तयार केली जाणे आवश्यक आहेत. परंतु, ही यंत्रणा बंद असल्याने आजतागायत शाळांना देयके बनविता आलेली नाहीत. सप्टेंबर महिन्याचे वेतन थकणार आहे. देयके वेळेत तयार झाली नाहीत तर मुख्याध्यापकांवरच कारवाई करण्याचे आदेश आहेत. परंतु, सरकारच्याच चुकीमुळे ही यंत्रणा बंद झाल्याने त्याचे खापर निरपराध मुख्याध्यापकांवर फोडले जाऊ नये, अशी अपेक्षा शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली.