सणाच्या दिवशी परीक्षा न घेण्याचा नियम मोडीत
उत्सवांच्या काळात परीक्षा घेऊ नयेत, स्थानिक परिस्थितीनुसार सणांच्या सुट्टय़ांचे पालक-शिक्षक संघाच्या संमतीने नियोजन करावे, असे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र, त्याच वेळी गेल्या दोन महिन्यांपासून नुसत्याच चर्चेत असणाऱ्या पायाभूत चाचणीसाठी गणेशोत्सवाचाच मुहूर्त शासनाने शोधला आहे. राज्यातील शाळांमध्ये १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पायाभूत चाचण्या घेण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.

उत्सवांच्या काळात शाळांच्या सुट्टय़ा आणि परीक्षांवरून दरवर्षी शासन, शाळा व्यवस्थापन, पालक यांच्यात वाद होत असतात. प्रत्येक भागांनुसार सणांचे महत्त्व वेगळे असते. त्या पाश्र्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, पर्युषण पर्व, ईद अशा धार्मिक सण किंवा उत्सवांच्या कालावधीत अल्प मुदतीच्या सुट्टय़ांचे नियोजन पालक-शिक्षक संघाच्या संमतीने करण्यात यावे, असा आदेश शासनाने मंगळावारी प्रसिद्ध केला. त्याचप्रमाणे सण-उत्सवांच्या काळात शाळांनी कोणत्याही चाचणी परीक्षांचेही नियोजन करू नये असेही या निर्णयांत म्हणण्यात आले आहे. मात्र, त्याच वेळी आपणच जाहीर केलेला निर्णय मोडीत काढत शिक्षण विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पायाभूत चाचण्यांचे आयोजन केले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या वयानुरूप क्षमतांची चाचणी घेण्यासाठी नैदानिक चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. वर्षभरात घेण्यात येणाऱ्या तीन चाचण्यांपैकी पहिली म्हणजे पायाभूत चाचणी जुलैमध्ये घेण्याचेही जाहीर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून या चाचण्यांच्या नियोजनाची नुसतीच चर्चा आहे. आता या चाचण्यांचे नियोजन शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केले आहे. मात्र, त्यासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त शोधला आहे. त्यामुळे या चाचण्या आता नव्या वादात सापडल्या आहेत.
याबाबत परिषदेतील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘गणेशोत्सव १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान आहे. चाचण्या १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान शाळांनी त्यांच्या सोयीने घ्यायच्या आहेत. भाषा आणि गणित असे दोनच विषय असल्यामुळे शाळांना नियोजन करताना काहीच अडचण येण्याचे कारण नाही.’