अभियांत्रिकी शाखेसाठी या वर्षी महाराष्ट्रात साधारण दीड लाख जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्येक विषयामध्ये किमान ४५ गुणांची अट शिथिल न केल्यामुळे या वर्षीही अभियांत्रिकीच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (७ जून) सुरू करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांमध्ये खुल्या गटासाठी किमान ४५ टक्के आणि राखीव गटासाठी किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. किमान ४५ टक्क्य़ांच्या पात्रतेची अट हा केंद्रीय स्तरावरील निर्णय असल्यामुळे ही अट शिथिल करण्यात येणार नसल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी ४५ टक्क्य़ांची अट पूर्ण करू शकत नसल्यामुळे अभियांत्रिकी शाखेसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या वर्षी रिक्त जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी राज्यातील ४० हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. या वर्षी नव्याने ११ अभियांत्रिकी महाविद्यालये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी १३ जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालयांचे पर्याय द्यायचे आहेत. कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची हार्डकॉपी स्वीकारण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होणार असून १४ जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ जूनला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया २२ जूनपासून सुरू होणार असून २० जुलैपर्यंत चालणार आहे. http://www.dte.org.in/fe2013. या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत. प्रवेशअर्जाबाबत काही अडचण आल्यास (०२२) ३०२३३४४४/४५/४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.