विद्यार्थ्यांकडून आता फारशी मागणी नसलेल्या अभ्यासक्रमांची भाऊगर्दी झाल्याने यंदा अभियांत्रिकी शाखेच्या तब्बल ६० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकीची ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’ची (कॅप) दुसरी फेरी बुधवारी (१०जुलैला) संपली. या फेरीनंतर तब्बल ५४,९४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र त्याचवेळी अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणारे आणखी २० हजार विद्यार्थी प्रवेशाविना आहेत हे विशेष.
अभियांत्रिकीच्या ४५ हजार जागा तर अशा आहेत की ज्यांना कोणीच वाली नव्हता. म्हणजे या जागांसाठी कुणीच पसंतीक्रम दिलेला नाही. प्रवेशाविना असलेल्या २० हजार विद्यार्थ्यांकरिता लवकरच औरंगाबाद येथे कौन्सिलिंग फेरी राबविली जाईल. पण, आतापर्यंतच्या अनुभवानुसार यात केवळ चार ते पाच हजार जागांचे प्रवेश होतील. उर्वरित ५० हजार जागा रिक्तच राहतील. या जागांमध्ये व्यवस्थापन कोटय़ातील सुमारे १० हजार रिक्त जागा मिळविल्या तर या वर्षी रिक्त जागांची संख्या तब्बल ६० हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
जागा रिक्त राहण्याचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक म्हणजे २०,४८२ आहे. त्या खालोखाल नागपुरात १०,५१४, नाशिकमध्ये ८,७४६ जागा रिक्त आहेत. मुंबईत ४,९२६ जागा रिक्त आहेत.
राज्यात कॅप आणि व्यवस्थापन कोटय़ाच्या मिळून अभियांत्रिकीच्या तब्बल १,६०,७१९ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी कॅपमध्ये १,३३,६०४ जागांसाठी १,५५,००० विद्यार्थी इच्छुक होते. कॅपच्या जागांपैकी ७३ हजार जागा पहिल्या फेरीला रिक्त होत्या. दुसऱ्या फेरीसाठी २८,८८५ विद्यार्थ्यांना जागावाटप करण्यात आले. यापैकी साधारणपणे १९ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित नऊ हजार आणि कुठेच जागावाटप न झालेले २० हजार असे सुमारे २९ हजार विद्यार्थी १६ जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कौन्सिलिंगच्या फेरीत सहभागी होतील. मात्र बहुतांश जागा फारशा मागणी नसलेल्या अभ्यासक्रमांच्या वा दर्जाहीन महाविद्यालयांच्या असल्याने त्या बहुतकेकरून रिक्तच राहतील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

विभागवार रिक्त जागा
विभाग            रिक्त जागा
पुणे            २०४८२
नागपूर            १०५१४
नाशिक            ८७४६
औरंगाबाद        ६१२१
मुंबई            ४९२६
अमरावती        ४१५२
एकूण            ५४९४१
अभियांत्रिकीच्या रिक्त जागा रिक्त राहणे हे आता दरवर्षीचेच चित्र आहे. रिक्त जागांच्या संदर्भात एआयसीटीईने आता धोरण निश्चित करायला हवे.
   – डॉ. एस. के. महाजन, प्रभारी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय