राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी आता तंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटचा प्रयत्न केला आहे. शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांमधील १३५ रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी राबवण्यात येणार असून सोमवारी (३ ऑगस्ट) या फेरीची सुरुवात होणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या वर्षी मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. या वर्षी राज्यात अभियांत्रिकीची प्रवेश क्षमता १ लाख ६४ हजार होती. दोन प्रवेश फे ऱ्या आणि समुपदेशन फे ऱ्यांनंतर साधारण ७५ हजार जागा रिक्त असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये शासकीय महाविद्यालये, अनुदानित महाविद्यालयांचाही समावेश आहे. राज्यात शासकीय आणि अनुदानित महाविद्यालये ११ आहेत. त्यांमध्ये रिक्त असलेल्या १३५ जागांसाठी ही प्रवेश फेरी होणार आहे.
या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अर्ज भरायचे आहेत. रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयांचे २५ पर्याय विद्यार्थ्यांनी द्यायचे आहेत. या प्रवेश फेरीसाठीचे रिक्त जागांचे तपशील आणि महाविद्यालयांचे संकेतांक सोमवारी तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांने दिलेल्या पर्यायांपैकी महाविद्यालय मिळाल्यास यापूर्वी घेतलेल्या महाविद्यालयांतील प्रवेश रद्द होऊन त्याचा लगेच या प्रवेश प्रक्रियेतही समावेशही होणार आहे. त्यामुळे हव्या असलेल्या महाविद्यालयांतील आणि शाखेतील रिक्त जागा पाहूनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने केले आहे. या फेरीसाठी ३ ते ६ ऑगस्ट या कालावधीत अर्ज भरायचे आहेत. ५ आणि ६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत विद्यार्थी अर्ज निश्चित करू शकतात. प्राथमिक प्रवेश यादी ७ ऑगस्टला जाहीर होणार असून ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत.
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान?
अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावी, असे आदेश गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे विशेष प्रवेश फेरी ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा आरोप खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संघटनेने केला आहे.9

‘‘विशेष प्रवेश फेरी ही फक्त शासकीय महाविद्यालयांसाठीच राबवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत नाही. शासकीय महाविद्यालयांमध्ये काही शाखांच्या जागा रिक्त आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा हा या फेरीमागे उद्देश आहे. या जागा कमी असल्यामुळे खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशावर परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी रिक्त जागा आणि आपली पसंती याची सांगड घालूनच प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे किंवा नाही याचा निर्णय घ्यावा.’’
– सुभाष महाजन, तंत्रशिक्षण संचालक