मुंबई विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी ऑनलाईन मूल्यांकन प्रकल्पाला सुरुवातीलाच अडचणींचा ‘जोर का धक्का’ लागल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र यंदा तब्बल दहा दिवस उशिराने सुरू करण्यात येणार आहे. दुसरे सत्र लांबल्याने अभियांत्रिकीच्या मे, २०१४ मध्ये होणाऱ्या शेवटच्या सत्राच्या परीक्षाही यंदा लांबणार आहेत.
एरवी अभियांत्रिकीचे दुसरे शैक्षणिक सत्र दोन जानेवारीला सुरू होऊन १६ एप्रिलला संपते. परंतु, या वर्षी हे सत्र १३ जानेवारीला सुरू करण्यात येणार आहे. दहा दिवस लांबल्याने हे सत्र २६ एप्रिलला संपेल. अर्थातच केवळ सत्र पुढे ढकलण्यात येणार आहे. हे करताना अध्यापनाचे दिवस कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे, दुसरे सत्र नेहमीप्रमाणे ९० दिवसांचेच असणार आहे.
१९ डिसेंबरला अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे ऑनलाईन मूल्यांकन सुरू करून या योजनेचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार होता. सुरुवातीला हा प्रयोग अभियांत्रिकीच्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांपुरता राबविण्यात येणार होता. परंतु, ऑनलाईन मूल्यांकनासाठीची तयारी पूर्ण न झाल्याने त्यात विद्यापीठाला यश आले नाही.
ऑनलाईन मूल्यांकन तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून सध्या विद्यापीठ प्रशासन विविध चाचण्या करण्यात गुंतले आहे. विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग केल्यानंतर त्या १० परीक्षा केंद्रांवर पाठविल्या जाणार आहेत.
त्यानंतर या केंद्रांवर प्रत्यक्ष ऑनलाईन मूल्यांकन सुरू होईल. त्यानंतर मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास २० ते २५ दिवसांचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे. एकदा मूल्यांकन सुरू झाले तर निकाल जाहीर होण्यास वेळ लागणार नाही.