चौथी-सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेवर एकेकाळी असलेले मराठी माध्यमाचे वर्चस्व मोडीत निघाले असून इंग्रजी माध्यमाचा पगडा वाढला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाने मात्र मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची पताका उंच ठेवण्यात यश मिळवले आहे. मुंबईत या वर्षी शिष्यवृत्ती मिळालेल्या सातवीच्या एकूण १६१७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २८२ विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. तर पुणे शहरात शिष्यवृत्ती मिळविलेल्या ४१० पैकी केवळ १२६ विद्यार्थी मराठी माध्यमात शिकणारे आहेत. हे चित्र खासकरून मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरी भागातीलच आहे.
मुंबईतील जादू ओसरली!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मराठी, इंग्रजी, ऊर्दू, कन्नड, गुजराथी अशा विविध भाषांमधून ही परीक्षा घेतली जाते. एक काळ असा होता की मुंबईत बालमोहन, पार्ले टिळक अशा शाळांमधील शंभर-सव्वाशे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत असत. पण, मराठी माध्यमांच्या शाळांची ही जादू आता ओसरत चालली आहे. मुंबईतील अमरकोर विद्यालयासारख्या काही ठराविक मराठी शाळा सोडल्या तर मराठी माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेत झळकणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.
राज्यातील इतर चित्र वेगळे
सातवीच्याच नव्हे तर चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही हेच चित्र दिसून येत आहे. यंदा मुंबईतून १९७७ विद्यार्थ्यांना चौथीची शिष्यवृत्ती मिळाली. त्यापैकी तब्बल १३७४ इतके विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाचे आहेत. रायगडमध्ये तर १२५ पैकी तबब्ल ८० विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाचे आहेत. पुण्यातही ५०१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३६५ विद्यार्थी एकटय़ा इंग्रजी माध्यमाचे आहेत. ग्रामीण भागात मात्र हे चित्र नेमके उलट आहे. मराठी माध्यमांच्या मुंबई शहर, उपनगर मिळून पहिल्या १५० मध्ये आलेल्या सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ ११ विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. तर पुणे ग्रामीण भागात मात्र पहिल्या १५ क्रमांकावरील सर्व विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. काही ठराविक शाळा ठरवून या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. अशाच मराठी शाळांमधून विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवित असल्याचे निरीक्षण संदीप गमरे या शिक्षकांनी मांडले.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची मुलेच शिष्यवृत्ती मोठय़ा संख्येने पटकावत आहेत. कारण, या शाळांच्या दर्जा वाढीसाठी ग्रामविकास विभागाने जे निकष तयार केले आहेत त्यात शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी किती हे देखील पाहिले जाते. म्हणून त्या शाळा शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेतात. या उलट शहरात पालकांचा, शाळेचा निरुत्साह यामुळे मोजक्या मराठी शाळा वगळता मराठी शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेत फारसे चमकत नाहीत.      –  प्रशांत रेडीज, प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना.