दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या दहावीच्या निकालात गणित विषय घात करणारा ठरला आहे. पण, लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे इंग्रजीनेही यंदा विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणावर दगाफटका केला आहे.
मुंबईतून इंग्रजी विषयात परीक्षा देणाऱ्या १,२६,७९९ पैकी ६६८० विद्यार्थ्यांना या विषयाने गुगली दिली आहे. इतर कोणत्याही विषयाचा निकाल घसरण्याचे प्रमाण एक टक्क्य़ाच्या आसपास आहे. पण, इंग्रजीत हे प्रमाण तब्बल तीन टक्के आहे. त्या खालोखाल सामाजिक शास्त्राने विद्यार्थ्यांना धक्क्य़ाला लावले आहे. या विषयाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्य़ांनी घसरला आहे. तुलनेत कठीण समजल्या जाणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील निकाल मात्र दोन टक्क्य़ांनी वधारला आहे हे विशेष.
मुलींची बाजी
मुली – ८९.५८ टक्के
मुलगे – ८८.३१टक्के
पश्चिम उपनगरे आघाडीवरच
सर्वोत्तम गुण मिळविण्यात मुंबई विभागातील पश्चिम उपनगरातील विद्यार्थी गेल्या वर्षीप्रमाणे आघाडीवर आहेत. येथील तब्बल २४.९७ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या भागाचा निकालही मुंबईत सर्वाधिक म्हणजे ८७.२० टक्के इतका आहे. त्या खालोखाल ठाणे विभागाचा (८४.३२टक्के) निकाल आहे.
मुंबईतील एकूण ३,४२६ शाळांपैकी १७ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. तर ६८३ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.