शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविषयी ठाण्यातील शालेय वर्तुळात उत्सुकता आणि नाराजी अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत होत्या. गौरी-गणपतींच्या सुट्टीनंतर शाळांचे वर्ग भरले खरे, मात्र दिवसभर मोदी यांच्या भाषणाची चर्चा शाळांमध्ये होती. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून शाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्येही त्यामुळे जोश दिसत नव्हता.
दुपारी पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, परंतु कार्यक्रम लांबू लागताच विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. मुसळधार पावसात मुलांना दुपारच्या वेळेत शाळेत सोडावे लागल्यामुळे पालक वर्गात नाराजीचे तीव्र सूर उमटताना दिसत होते. हा कार्यक्रम ऐच्छिक असल्याचे एकीकडे भासवले जात असले तरी विद्यार्थ्यांनी भाषण ऐकण्यासाठी हजर राहावे, असे छुपे फर्मान मात्र काढण्यात आले होते.