पालक संघटनेला विश्वासात न घेता दीडपट शुल्कवाढीचा निर्णय घेणाऱ्या ठाण्यातील सरस्वती इंग्लिश स्कूल या शाळेला पालकांनी गुरुवारी चांगलाच हिसका दाखवला. पुढील वर्षांत ई-लर्निग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे शाळा प्रशासनाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. २०५० रुपयांवरून थेट ५००० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच शाळा प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला.
या शाळेने विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षांतील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच एका दिवसात हे वाढीव शुल्क भरण्याचे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सांगितले होते. त्यामुळे संतप्त झालेले सुमारे दीडशे ते दोनशे पालक गुरुवारी शाळा परिसरात जमले होते. त्यांनी शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, शाळेत ई-लर्निग सुविधा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी उच्च दर्जाचे टेबल, फलक, प्रोजेक्टर्स आदी साहित्य खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे शुल्कात वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले. मात्र, शाळा प्रशासनाने शुल्कात वाढ करू नये, अशी भूमिका घेत पालकांनी शाळेसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे अखेर शाळा प्रशासनाने नमते घेत शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला.