महाराष्ट्र वनसेवेतील सहायक वनसंरक्षक आणि नवक्षेत्रपाल या पदांसाठी झालेल्या पूर्वपरीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी ऐनवेळी मराठी माध्यमाची सोय रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिलेल्या निकालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णय बदलण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी येथील दानिश, कासिफ आणि रशीद युसूफ पठाण या तीन भावंडांनी मॅटकडे याचिका दाखल केली होती.
या परीक्षेची जाहिरात आयोगाने जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये ही परीक्षा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून देता येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत माध्यमाचा उल्लेख नव्हता . २७ एप्रिल रोजी झालेली ही परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमातूनच झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी मॅटकडे धाव घेतली.