महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सन २०११ मध्ये साहाय्यक कार्यकारी अभियंतापदासाठी  घेण्यात आलेल्या राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेमध्ये गौतम शिरीष मुसळे याने ३९४ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेमध्ये प्रवीण चावरे दुसऱ्या तर गोकुळ महाजन तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर याच अंतर्गत घेण्यात आलेल्या साहाय्यक अभियंता परीक्षेमध्ये रोहन जाधव ३४३ गुण मिळवून अव्वल आला आहे.
साहाय्यक कार्यकारी अभियंता, गट -अ या पदासाठी एकूण २२ जागा रिक्त होत्या. यामध्ये खुल्या संवर्गातील ११, अनुसूचित जातींकरिता ३, अनुसूचित जमाती व अन्य मागास यांकरिता प्रत्येकी २ तर उर्वरित संवर्गासाठी एकूण चार जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या. यामध्ये गौतम मुसळे याने साडे आठशेपैकी ३९४ गुण मिळवले. दुसऱ्या क्रमांकावरील प्रवीणने ३५८ तर गोकुळ महाजनला ३५७ गुण मिळाले.
साहाय्यक अभियंता, गट – अ या पदासाठी एकूण ५२ जागा रिक्त होत्या. या परीक्षेत रोहन जाधव ३४३ गुणांसह प्रथम स्थानी, चारुदत्त महाजन ३४१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर तर गणेश हसे ३४१ गुणांसहच तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या परीक्षेत खुल्या संवर्गाकरिता किमान गुणमर्यादा ३१७ असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगातर्फे सप्टेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे.