राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत कॅट, जीमॅट यांसारख्या देशपातळीवरील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत समाविष्ट न केल्याने चांगले गुण असूनही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या १९ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या आहेत.
गेल्या वर्षी देशपातळीवरील प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयांची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. या वर्षी मात्र, तंत्रशिक्षण विभागाने व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी राज्य पातळीवरील स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली. मात्र, त्याच वेळी देशपातळीवरील परीक्षांच्या माध्यमातूनही प्रवेश देण्यात आले. देशपातळीवरील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के जागा राखीव ठेवून पहिल्या दोन फे ऱ्यांमध्येच प्रवेश देण्यात आले. तिसऱ्या फेरीमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला नाही. प्रवेशाची तिसरी फेरी फक्त राज्याची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ठेवण्यात आली. त्यामुळे देशपातळीवरील प्रवेश परीक्षेत चांगले गुण असूनही आणि रिक्त जागा असतानाही या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत.
कॅट २०१४ चे अर्ज आजपासून उपलब्ध
व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयआयएम इंदूरकडून घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्टच्या (कॅट) परीक्षा पद्धतीमध्ये या वर्षी बदल करण्यात आला असून परीक्षेतील प्रश्नसंख्या आणि कालावधी वाढवण्यात आला आहे. या वर्षीपासून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी १४० मिनिटांऐवजी १७० मिनिटे मिळणार आहेत. मात्र, त्याच वेळी परीक्षेतील प्रश्नसंख्याही वाढवण्यात आली आहे. या परीक्षेसाठीचे अर्ज बुधवारपासून उपलब्ध होणार आहेत.