खुल्या आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीच्या माध्यामाद्वारे १० भाषांमध्ये ५०० विनामूल्य अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने सरकार खुल्या आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीबाबत नियमावली तयार करता येईल का, याची पडताळणी करीत आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला स्पष्ट केले.

खुल्या आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात सामाजिक विज्ञान, सर्वसाधारण विज्ञान आदींचा समावेश असेल. या वर्षी १० भाषांमध्ये ५०० अभ्यासक्रम खुल्या आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे सुरू करण्याची योजना आहे, असे इराणी म्हणाल्या.

सदर अभ्यासक्रम ऑनलाइन आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून तो विनामूल्य असेल, असेही इराणी यांनी नमूद केले.