केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमातील गोंधळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आयोगाने पूर्वपरीक्षा घेऊ नये, अशी विनंती केंद्र सरकारतर्फे लोकसेवा आयोगाला करण्यात आली आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय नागरी सेवांसाठीची पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र या परीक्षेतील सीसॅट अर्थात प्रशासकीय कल परीक्षण चाचणीच्या प्रश्नपत्रिकेसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत अनेक विद्यार्थ्यांचे आक्षेप आहेत. त्या पाश्र्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे.
गेले काही महिने दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी पूर्वपरीक्षेतील दुसऱ्या क्रमांकाच्या पेपरबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत. या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषेवरील प्रश्न हे इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ ठरतात आणि त्यांना गुण मिळविताना लाभ होतो. मात्र प्रादेशिक भाषांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रकार अवघड जातो. त्यामुळे सदर प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देत नाही, असा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.
या अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. या समितीने शक्य तितक्या तातडीने आपल्या शिफारशी जाहीर कराव्यात, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगानेही पूर्वनियोजित वेळापत्रकातील २४ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी विनंती केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्री जितेंद्र सिंग यांनी केली.
देशातील विद्यार्थ्यांनी उपोषण करणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे आणि म्हणूनच जोपर्यंत पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत समिती आपला अभिप्राय जाहीर करत नाही तोवर आयोगाने परीक्षा घेऊ नयेत, असे आवाहन जितेंद्र सिंग यांनी केले. लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले. मात्र खासदारांनी केलेली या प्रश्नावरील स्थगन प्रस्तावाची मागणी सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावली.