17 December 2017

News Flash

तिच्या यशाने साऱ्या समाजाला ऊर्जा..

पाच बहिणी, एक भाऊ, अशिक्षित आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: January 23, 2013 1:03 AM

पाच बहिणी, एक भाऊ, अशिक्षित आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही कठीण ठरावे. पण ‘शिकून मोठं व्हायचय’ हे एकच स्वप्न उराशी बाळगलेल्या कोल्हापूरच्या धनश्री विलास तोडकर या विद्यार्थिनीने स्वप्नपूर्ती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धनश्री चार्टर्ड अकौटंटची कठीणतम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या यशापासून प्रेरणा घेण्यासाठी मंगळवारी धनश्रीच्या झोपडीवजा घरात गरीब, गरजू विद्यार्थी व पालकांची रिघच लागली होती. अनेकांना स्वप्न पाहण्याची ऊर्जाच धनश्रीच्या यशात लपली असल्याचे जाणवत होते.
धनश्री तोडकर या युवतीचा यशाचा पट जितका रोचक तितकाच नजरेत अश्रू तरळायला लावणारा. कोल्हापुरातील कमला कॉलेजच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये तिच्या आजीसमवेत वडील ४० वर्षांपूर्वी राहायला आले. आठवीपर्यंत शिक्षण झालेले वडील आणि सातवीपर्यंत शिकलेली आई यांचा गरिबीत संसार सुरू असताना एका पाठोपाठ एक सहा मुली जन्मल्या. त्यानंतर एक मुलगा. सुरुवातीची २० वर्षे नोकरी आणि पुढची तितकीच वर्षे चहाचा गाडा चालविणाऱ्या विलास तोडकर यांनी मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. दोन मुली शिक्षिका झाल्या. एक दवाखान्यात स्वागतिका अन् दोघी पदवीधर होऊन संसारात रमलेल्या.
धनश्रीने मात्र खूप शिकावे ही पालकांची इच्छा. १२ वीच्या वाणिज्य शाखेत शिकत असताना तिने ती पूर्ण केली. २००४ मध्ये गुणवत्ता यादीत ती १७ वी आली. त्याच दिवशी आताचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तिची भेट घेऊन शिक्षणाचा सर्व खर्च पूर्ण करण्याचा शब्द दिला. आज ती सी. ए. झाली असताना त्यांचा शब्दही खरा ठरला. १२ वी नंतर धनश्रीने सी.ए.व्हायचे ठरविले. कोल्हापुरातील आर. बी. भागवत अँड कंपनी या चार्टर्ड अकौटंट कंपनीत ती शिकत होती. तेथे नोकरी असलेली दीपाली गोरे व नीलेश भालकर यांनी शिकण्यासाठी तिला मदत केली. शिकवणीसाठी जाणाऱ्या प्रा. श्रीमती घेवारी यांनी तिचे मनोधैर्य वाढविले. थोरली बहीण उमा जाधव हिने तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
घरच्या गरिबीमुळे अनेकदा तिला शिक्षण थांबवून नोकरी करण्याची इच्छा होत असे. सी. ए. करताना अ‍ॅग्रीगेट सादर करताना तो विषय राहिला की तिला खूपच वाईट वाटायचे. एक विषय राहिल्यामुळे सगळ्या विषयांची परीक्षा पुन्हा देताना नव्याने अभ्यासाचे कष्ट उपसावे लागत असे. मुळातच अभ्यासासाठी घरी जागा नसायची. वडिलांचा चहाचा गाडा असलेल्या डॉ. निगडे हॉस्पिटलमध्ये अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली. तिचा पुरेपूर वापर करीत ती सी. ए. चा कठीण असणारा अभ्यास तेथे पूर्ण करीत राहिली.
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत वडिलांचा चहाचा गाडा हटविला गेला तेव्हा आई घरातून चहा हॉस्पिटलमध्ये नेऊन रुग्णांना पोहचवत असे. अभ्यासातून वेळ काढून धनश्री आईच्या मदतीसाठी उभी राहात असे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करीत ती पुढे शिकत राहिली आणि आज सी.ए.होऊन आयुष्याच्या यशाचे गणित सोडविण्यात ती यशस्वी ठरली आहे. थोडे दिवस नोकरी केल्यानंतर सीसा, डीसा यासारखे उच्च शिक्षण घेऊन सुस्थिर होण्याचे स्वप्न आता तिच्या डोळ्यामध्ये चमकत आहे. गरीब परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी धनश्रीशी मनमोकळा संवाद साधला. अनेकांना भावनावेग न आवरल्याने अश्रू रोखणे कठीण बनले होते, पण याचवेळी या विद्यार्थ्यांच्या खचलेल्या मनात प्रेरणेची ऊर्जा भरण्याचे काम धनश्रीच्या यशाने केले.

मुंबईकर प्रेमा जयकुमार सीए परीक्षेत देशात पहिली, भावाचेही यश
रिक्षा चालवत मुंबईतील चाकरमान्यांची सेवा करणाऱ्या चालकाच्या मुलीने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. प्रेमा जयकुमार असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून, विपरीत परिस्थितीशी झुंजून तिने हे अद्वितीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्रेमाच्या भावानेही याच परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. भावा-बहिणीच्या यशाने जयकुमार कुटुंबियांमध्ये आनंदचे वातावरण आहे.मुंबईमधील पश्चिम उपनगरात मालाड येथे चाळीत प्रेमा आपल्या कुटुंबीयांसह राहाते. नोव्हेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला मिळालेल्या यशाने आपण सुखावलो असल्याची प्रतिक्रिया प्रेमा हिने व्यक्त केली.या यशासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळेच ही माझ्या आयुष्यातील अद्वितीय बाब असल्याचे प्रेमा म्हणाली. प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल हे रिक्षाचालक आहेत. आपल्याला मिळालेल्या या यशामुळे आता आई-वडिलांचे कष्ट कमी होतील आणि आमच्या कुटुंबाला अधिक समाधानाने आयुष्य कंठता येईल, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया प्रेमा हिने एका प्रश्नाचे उत्तर देताना व्यक्त केली. ८०० पैकी ६०७ गुण मिळवणाऱ्या प्रेमाने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना दिले. पालकांचा सातत्याने मिळणारा पाठिंबा, त्यांचे प्रेरक शब्द यांच्याशिवाय हे यश मिळूच शकले नसते, असे तिने सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या बी.कॉम.च्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या प्रेमा हिच्या सख्ख्या भावानेही आपल्या बहिणीसह सीएच्या परीक्षेत धवल यश मिळवले आहे.

सीए परीक्षेचा निकाल जाहीर
डिसेंबर-नोव्हेंबर, २०१२मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून मुंबई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. वर्षांतून दोन वेळा ही परीक्षा होते. सीएची परीक्षा सुमारे लाखभर विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २७.३० टक्के विद्यार्थी पहिल्या गटात, २१.८५टक्के विद्यार्थी दुसऱ्या गटात आणि १२.९७टक्के विद्यार्थी दोन्ही गटातून उत्तीर्ण झाले आहेत. तर दोन्ही गटाची परीक्षा देणाऱ्या २९ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी अवघे ३ हजार ८०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कॉमन प्रोफिशिअन्सी टेस्ट ही परीक्षा देशभरातून एक लाख ११ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी, अवघे ३० हजार ३०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण २७.०७ टक्के इतके आहे.

First Published on January 23, 2013 1:03 am

Web Title: her success give power to all society
टॅग Dhanshree,Kgtopg